मराठी चित्रपटसृष्टीत आशयपूर्ण आणि वेगळ्या विषयांना नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळते. लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य कसं बदलतं, नवीन नाती, जबाबदाऱ्या आणि स्वतःची ओळख जपण्याचा प्रवास ‘लग्न आणि बरंच काही’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. या आगामी चित्रपटाचं पोस्टर आज ( १९ ऑगस्ट ) मंत्रालयात अनावरण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते या पोस्टरचं अनावरण झालं.

म्हाळसा एंटरटेन्मेंटच्या डॉ. संजना सुरेश पै आणि अव्यान आर्ट्सच्या अंजली तुषार नान्नजकर यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन वेदांती दाणी यांनी केलं आहे. पोस्टरचं अनावरण करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चित्रपटाच्या टीमचं अभिनंदन करून आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीदेखील चित्रपटाच्या विषयाचं कौतुक केलं आहे. मुलीच्या जन्मापासून बालपण, तारुण्य आणि पुढील आयुष्यापर्यंतच्या अनुभवांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. आजी, आई, सध्याची पिढी अशा तीन पिढ्यांतील महिलांना हा विषय जोडणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच चित्रपटातून महिलांसह पुरुषांनाही नातेसंबंध आणि आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळेल, असं त्यांनी नमूद केलं आहे.

लग्नानंतर स्त्रीच्या आयुष्यात सुरू होणारा नवा प्रवास, बदलती नाती, वाढणाऱ्या जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या स्वप्नांकडे पाहण्याचा दृष्टीकोन या सगळ्या गोष्टी चित्रपटातून संवेदनशीलपणे मांडण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या पडद्यामागील निर्मितीतही महिलांचा मोठा सहभाग आहे. संगीत वैशाली सामंत, छायाचित्रण स्मिता निर्मळ, संकलन भक्ती मायाळू, संवाद शर्वरी पेटकर, कथा यशश्री मसूरकर, वेशभूषा अपेक्षा गांधी सोनी, मीडिया दिग्दर्शन प्रज्ञा सुमती, डिजिटल मार्केटिंग अश्मिकी टिळेकर, पब्लिसिटी डिसाईन प्राजक्ता डोंगरे यांनी चित्रपटाच्या विविध विभागांची धुरा सांभाळली आहे. तसेच अभिनेत्री पूजा सावंत आणि अक्षया नाईक यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

पोस्टर अनावरणानंतर ‘लग्न आणि बरंच काही’च्या कथानकाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. आता पूजासह या सिनेमात प्रमुख भूमिकेत कोणता अभिनेता झळकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली जाईल.