Puja Sawant-Nirmiti Sawant New Movie Cup Bashi Teaser: पूजा सावंत लवकरच ‘कप-बशी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरच्या सुरुवातीला निर्मिती सावंत व पूजा सावंत यांच्यातील संवाद ऐकायला मिळतो.
निर्मिती सावंत व पूजा सावंत एकत्र झळकणार
निर्मिती सावंत पूजा सावंतच्या पात्राला विचारतात की नाव काय तुझं? त्यावर ती अमृता असं उत्तर देते. तिला पुन्हा प्रश्न विचारला जातो की किती शिकली आहेस? त्यावर पूजाचे पात्र म्हणजेच अमृता म्हणते की मी मास मीडियामध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. पुढे तिला विचारण्यात येते की आमचा जितेंद्र तुला आवडला का? त्यावर अमृता म्हणते, “हो. पण, माझी एक अट आहे. माझी आणि माझ्या होणाऱ्या सासूची पत्रिका जुळली पाहिजे.” तिची अट ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. यावेळी तिला याआधी आलेल्या स्थळांची आणि तिची अट ऐकल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया कशी होती, याची झलक पाहायला मिळते.
टीझरमध्ये पुढे पाहायला मिळते जितेंद्र म्हणतो की या जन्मात माझं लग्न होईल, मला असं वाटत नाही. अमृताच्या अटीमुळे विविध ट्विस्ट पाहायला मिळतात. तसेच, जितेंद्रचे लग्न व्हावे म्हणून अनेक प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे. तसेच, अनेक गमतीजमती घडताना दिसत आहेत.
‘या’ तारखेला होणार सिनेमा प्रदर्शित
कल्पक सदानंद जोशी, सुकल्प चित्रा हे या सिनेमाचे निर्माते आहेत. तर वैभव चिंचाळकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात निर्मिती सावंत व पूजा सावंत यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकार दिसणार आहेत. हा सिनेमा १९ जूनला प्रदर्शित होणार आहे.
सिनेमात निर्मिती सावंत यांचा वेगळा लूक पाहायला मिळत आहे. त्यांची हेअरस्टाईल, चष्मा लक्ष वेधून घेत आहे. आता त्यांचा हा अंदाज प्रेक्षकांना आवडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, पूजा सावंत तिच्या भूमिकांबरोबरच वक्तव्यांमुळेदेखील अनेकदा चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या फिटनेसबद्दल, तिच्या डाएटबद्दल वक्तव्य केले होते. त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.
