Pooja Sawant on Kokan Life: पूजा सावंत सध्या विविध भूमिका आणि विविध चित्रपट या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज (३ एप्रिल २०२६) तिची प्रमुख भूमिका असलेला ‘सखे गं साजणी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

त्याबरोबरच तिचा ‘सालबर्डी’ हा सिनेमादेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये तिने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तसेच, निर्मिती सावंत यांच्याबरोबर तिने कप-बशी या सिनेमातदेखील काम केले आहे. या सिनेमातूनही पूजा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमाचे प्रमोशन करण्याच्या निमित्ताने पूजा विविध मुलाखती व सोशल मीडिया यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्रीने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत कोकणाबद्दलचे तिचे प्रेम व्यक्त केले आहे.

Award Banner

कोकणातील आयुष्याबद्दल पूजा सावंत म्हणाली…

पूजा सावंत या मुलाखतीत म्हणाली, “आम्ही कोकणात घर बांधतोय. थोडं थोडं बांधत आहोत. तिथलं जीवन हे खरं आयुष्य आहे. तिथली निवांत सुरू होणारी सकाळ खूप सुखद असते. शांत आणि हळुवार सुरुवात होणारी सकाळ तिथे असते; मुंबईत तसं नाहीये. घड्याळाच्या गजरानं आपण उठतो. त्यानंतर दिवसभरातील कामांबद्दल विचार करतो. त्यानंतर पळापळ सुरू होते. कोकणात तसं नाहीये.”

पूजा असेही म्हणाली, “कोकणातल्या घरात मला शांतता मिळते. मला तिकडे निसर्गाबरोबर वेळ घालवायला मिळतो. आपल्या सगळ्यांनाच त्याची आता गरज आहे.”

पूजा सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते. अनेकदा ती तिचे कोकणातील फोटो शेअर करते. तिच्या फोटोंवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतात.

पूजा सावंतने आणखी एका मुलाखतीत तिच्या व्यायाम आणि दिनचर्येबद्दल वक्तव्य केले आहे. ती म्हणाली की ती सकाळी लवकर उठते. सूर्यादयापर्यंत व्यायाम करते. भरपूर पाणी पिते. तसेच, रात्री १० वाजता झोपते. रात्री उशिरा ती पार्टीला जात नाही. याबरोबरच, अभिनेत्रीने असेही सांगितले की तिला वर्षानुवर्षे पहाटे व्यायाम करण्याची सवय आहे.

पूजा जितकी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते, तितकीच ती तिच्या नृत्यासाठीदेखील ओळखली जाते. आता अभिनेत्रीच्या नवीन चित्रपटांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच, आगामी काळात पूजा आणखी कोणत्या नवीन भूमिकांमधून पाहायला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.