Pooja Sawant : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ५ सप्टेंबरला दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. मुंबई-ठाण्यातील अनेक भागांमध्ये दहीहंडीचं भव्यदिव्य आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांना बॉलीवूडसह अनेक मराठी सेलिब्रिटींनी सुद्धा उपस्थिती लावली होती. दहीहंडी फोडणाऱ्या पथकांना सुद्धा लाखोंची बक्षीसं जाहीर करण्यात आली. मात्र, दरवर्षी दहीहंडी उत्सव जवळ आला की, सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो. हा व्हिडीओ असतो पूजा सावंतचा!

पूजा सावंतने जवळपास चार वर्षांपूर्वी “मच गया शोर, सारी नगरी में…” या अमिताभ बच्चन यांच्या एव्हरग्रीन गाण्यावर खास व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ पूजाने तिच्या कारमध्ये शूट केला होता. या व्हिडीओमध्ये मोरपिशी रंगाच्या साडीत पूजा खूप सुंदर दिसत होती. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ कितीही जुना असला तरीही, दरवर्षी दहीहंडी उत्सव जवळ आला की, पूजाचा हा व्हिडीओ व्हायरल होतोच. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला, ‘हा व्हिडीओ पुन्हा रिक्रिएट कर’ अशीही विनंती केली होती.

पूजाचा जुना व्हिडीओ

आता पूजाने शेवटी चाहत्यांच्या मागणीनुसार “मच गया शोर…” म्हणत आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, पूजाने हा व्हिडीओ यंदा कारमध्ये शूट केलेला नाहीये. यामध्ये मंजठा रंगाच्या साडीत अभिनेत्री खूपच सुंदर दिसतेय. हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, गळ्यात चोकर नेकलेस, मोत्याची कर्णफूलं या लूकमध्ये पूजाचं सौंदर्य आणखी खुललं आहे.

पूजाने नव्याने रिक्रिएट केला व्हिडीओ

पूजा या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “खास तुमच्यासाठी हा व्हिडीओ रिक्रिएट केला आहे…दहीहंडी स्पेशल!” नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी सुद्धा पूजाच्या हा व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सई गोडबोले, अभिजीत खांडकेकर, सुखदा खांडकेकर, कादंबरी कदम या कलाकारांनी तिच्या व्हिडीओवर खास कमेंट्स केल्या आहेत.

याशिवाय अन्य नेटकरी म्हणतात, “Old Is Gold तरीपण हे updated Version छान आहे”, “या Reel साठी किती वाट पाहिली आम्ही मॅडम”, “किती सुंदर दिसतेस”, “कारच्या व्हिडीओला तोडच नाही”, “दरवर्षी तुमची कारवाली व्हिडीओ आम्ही दहीहंडी आली की…शोधून पाहतो”, “तरीही सनरूफवाला व्हिडीओ १०० मतांनी पुढे”, “मस्त पूजा सावंत”, “कलरफूल सुंदर दिसतेय” अशा प्रतिक्रिया तिच्या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, पूजा सावंतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, यावर्षी ती ‘सालबर्डी’, ‘कप बशी’, ‘सखे गं साजणी’, ‘दृश्य अदृश्य’ अशा अनेक सिनेमांमध्ये झळकली. आता पूजा लवकरच ‘लग्न आणि बरंच काही’ या चित्रपटात झळकणार आहे. याचं पोस्टर लॉन्च झालं असून, लवकरच याची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईल.