Pooja Sawant On Daily Routine: पूजा सावंत ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. लवकरच ती ‘सखे गं साजनी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ३ एप्रिल २०२६ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये पूजासह प्रार्थना बेहेरे आणि अभिजीत खांडकेकरदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
सध्या पूजा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असल्याचे पाहायला मिळते. विविध मुलाखती आणि सोशल मीडिया या माध्यमांतून ती चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
आता नुकतीच तिने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती कशी फिट राहते, त्यासाठी ती काय करते, कोणते व्यायाम करते, तिचे डाएट कसे असते याबद्दल खुलेपणाने सांगते. ती नेमकं काय म्हणाली आहे ते जाणून घेऊ…
“गेली अनेक वर्षं मी पहाटे….”
पूजा सावंत म्हणाली, “गेली अनेक वर्षं मी पहाटे वर्कआऊट करते. त्यामुळे माझी मानसिकता अशी झाली आहे की, व्यायाम हा सूर्योदयापूर्वी व्हायला हवा. इतकी वर्षं मी पहाटे वर्कआऊट केल्यामुळे माझा दिवसभरात व्यायामच होत नाही. मी परत सांगते की, हे सायकॉलॉजिकल आहे. अनेक लोकांचं असं असतं की, दिनचर्या सांभाळून, जेव्हा त्यांचा जॉब संपतो तेव्हा ते संध्याकाळी जिमला जातात. तेसुद्धा ठीकच आहे. पण, माझं असं झालंय की, इतकी वर्ष पहाटे उठून वर्कआऊट करून मग शूटिंगला जायचं. तर ही एक माझी सवय झाल्यामुळे मी पहाटेच व्यायाम करते.”
पुढे ती असे म्हणाली, “माझा दिवस खूप आधी सुरू होतो. मी ५ वाजता उठते. माझा साडेपाच वाजल्यापासून वर्कआऊट सुरू असतो. साधारण सूर्योदय होईपर्यंत माझा व्यायाम संपतो आणि मग जेव्हा सूर्य वर येतो आणि अगदी कोवळी किरणं असतात, त्यामध्ये मेडिटेशन होतं. त्यानंतर मी माझ्या कामासाठी जाते. मी खूप काटेकोरपणे हे पाळलं आहे. कितीही शूट असू दे, कितीही काही असू दे, मी पहाटे उठूनच वर्कआऊट करते.”
जेव्हा तू भारताबाहेर असतेस तेव्हाही तुझी ही दिनचर्या पाळतेस का? त्यावर पूजा म्हणाली, “हो तेव्हाही माझी दिनचर्या अशीच असते.”
“मी १० वाजता…”
जेव्हा झोप पूर्ण होत नाही, तेव्हा सगळं नियोजन विस्कळित होतं का? त्यावर पूजा म्हणाली, “थोडं मॅनेज करावं लागत. कारण- जर तुम्हाला रात्री १० वाजता जर झोपता आलं, तर त्याच्याहून उत्तम गोष्ट कुठलीही नाही. मी १० वाजता झोपते. मला कुठलंही व्यसन नाही. माझ्या जीवनशैलीमध्ये पार्टी कल्चर नाही. १० वाजता पार्टीला जाऊया, असं मी करत नाही. त्यामुळे रात्री जागरण म्हटलं की, मला फार त्रास होतो”, असे म्हणत पूजाने रात्री उशिरा जागणे, पार्टी करणे टाळते असे सांगितले.
“तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा टास्क….”
रात्रीच्या जागरणाबद्दल ती म्हणाली, “जेव्हा आमच्या रात्रीच्या शिफ्ट्स असतात, तेव्हा तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा टास्क असतो. १० वाजता माझी ऊर्जा कमी होत असते. त्यामुळे जेव्हा शूटिंग असतं तेव्हा अॅडजस्ट करावं लागतं. जेव्हा उशिरा पॅकअप होतं म्हणजे अगदीच १२ ला शूटिंग संपलं, तर मग मी पहाटे उठत नाही. मग जी आठ तास किंवा सहा तासांची झोप असते ती मी झोप पूर्ण करते. जेव्हा मी वर्कआऊट करत नाही, तेव्हा मी इंटरमिटंट फास्ट करते.” असे म्हणत अभिनेत्रीने तिच्या दिनचर्येबद्दल आणि ती व्यायाम कधी करते, याबद्दलची माहिती दिली.
दरम्यान, आता इतर चित्रपटांप्रमाणे सखे गं साजनी या सिनेमालादेखील प्रेक्षकांचे प्रेम मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
