Pooja Sawant On Skin Care Routine: आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घेत असतो. त्यामध्ये आहार, व्यायाम अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. अनेकदा चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकारांची दिनचर्या कशी असते, ते त्यांच्या त्वचेची, केसांची काळजी कशी घेतात, याबद्दल जाणून घ्यायचे असते. कलाकारही अनेकदा त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यामातून तसेच त्यांच्या मुलाखतींतून
आता अभिनेत्री पूजा सावंतने एका मुलाखतीत तिच्या दिनचर्येबद्दल तसेच ती त्वचेची काळजी घेते याबद्दल वक्तव्य केले आहे. तिने नुकतीच लोकमत सखीला मुलाखत दिली.
या मुलाखतीत तिला विचारले की तुझं स्कीन केअर रुटिन काय असतं? त्यावर पूजा म्हणाली, “लहानपणासून माझी त्वचा कधीच क्लीअर नव्हती. मला नेहमी मुरुमांचा त्रास असायचा. त्यामुळे त्वचा छान आणि टवटवीत ठेवण्यासाठी मला लहानपणापासून प्रयत्न करावे लागले. आता माझी त्वचा चांगली दिसते, त्यामागे खूप मेहनत आहे.अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवावे लागते. एक रुटिन आहे, ते मला पाळावं लागतं.”
“पहाटेचा व्यायाम माझ्या…”
पुढे ती म्हणाली, “काही सवयी आहे, ज्या मी अत्यंत निष्ठने पाळते. एक म्हणजे दिवसाच्या पहिल्या सत्रात म्हणजे दुपारी बारापर्यंत मी काही करून दोन लीटर पाणी संपवते. माझी सकाळ फार लवकर होते. मी सकाळी साडेपाचला उठते. त्यानंतर वर्कआऊट करते. पहाटेचा व्यायाम माझ्या इतका अंगवळणी पडला आहे की मला अख्ख्या दिवसात वर्कआऊट करता येत नाही. मला व्यायाम करायचा असेल तर मी पहाटेच उठते. सूर्योदयापर्यंत माझा वर्कआऊट झालेला असतो. जेव्हा सूर्योदय होतो तेव्हाची जी कोवळी किरणं असतात ती घेते. त्यामुळे माझ्या त्वचेला ड जीवनसत्त्व मिळते.. मला वाटतं की, तिथून जे स्कीन रुटिन सुरू होतं.”
उन्हाळ्यात त्वचेची कशी काळजी घेतली पाहिजे? यावर पूजा म्हणाली, “उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. पाण्यात तुम्ही चार पुदिण्याची पाने टाका, अर्धा लिंबू पिळा, आल्याचा छोटा तुकडा चेचून त्यामध्ये टाका. असे पाणी मी उन्हाळ्यात पिते. त्याची खूप मदत होते.”
तसेच उन्हाळ्यात टॅनिंग कमी करण्यासाठी घरीच काय केले जाऊ शकते, हेही सांगितले. ती म्हणाली की टोमॅटोची एक फोड घ्यायची आणि तोंडावर फिरवायची. नंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे बेसन घ्यायचे. त्यात थोडेसे पाणी टाकायचे, त्याची पेस्ट करायची आणि ते चेहऱ्यावर लावायचे. पाच मिनिटांनी चेहरा धुवायचा.
दरम्यान, अभिनेत्री लवकरच सखे गं साजनी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच, तिच्या सालबर्डी या सिनेमाचीदेखील चर्चा सुरू आहे.
