Pooja Sawant : ‘महाराष्ट्राची कलरफूल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. आजवर पूजाने असंख्य मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनयाबरोबरच पूजाच्या फिटनेसचं सुद्धा कायम कौतुक केलं जातं. मूळची कोकणातली असूनही पूजा शुद्ध शाकाहारी आहे. लहापणापासून ती मासे खायची. पण, त्यानंतर अचानक असं काय घडलं की? पूजाने मांसाहार करणं सोडलं याचा खुलासा तिने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत केला होता.
पूजा ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणते, “मी प्युअर नॉन व्हेजिटेरियन होते. पण, ‘जंगली’ सिनेमाचं शूट होईपर्यंतच मी नॉनव्हेज खाल्लं. त्या सिनेमादरम्यान मी शुद्ध शाकाहारी झाले. मला प्राण्यांविषयी खूप प्रेम आहे…मला त्यांच्यासाठी खूप काही करायचं आहे. एवढे वर्ष मनात एक गिल्ट होतं की, आपण नॉनव्हेज का खातोय. पण, लहानपणापासून मी फिश खायचे…त्यामुळे मला ते सोडता येत नव्हतं. मांसाहार सोडणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. मी मान्य करते की, मी एवढी वर्षे नॉन व्हेज खाल्लंय. पण, मनात मग ती एक भावना येते…आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यानंतर मग मी नॉनव्हेज सोडण्याचा निर्णय घेतला.”
सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे – पूजा सावंत
“अनेक लोक असंही म्हणतात…तुम्ही एकट्याने नॉनव्हेज बंद करून काय होणारे? पण, बदल घडवायचा असेल तर तुम्ही सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे. ‘जंगली’ सिनेमामुळे मी निसर्गाच्या खूपच जवळ पोहोचू शकले. तिथे जंगलात शूटिंग झालं होतं. तेव्हा जाणवलं मोठी गाडी, एसी, मोठं घर हे सगळं काहीच नाहीये.”
३६५ दिवस ‘हा’ पदार्थ खाऊ शकते…
“ज्यावेळी मांसाहार बंद करून शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा जाणवलं अरे व्हेजमध्ये सुद्धा अनेक नवनवीन पदार्थ आहेत. पण, लोकांना पनीर आणि व्हेज कोल्हापुरी याच भाज्या माहिती असतात. मला स्वत:ला हिरव्या वाटाण्याची भाजी बनवायला फार आवडते. सोलकढी, सुक्या भेंड्याची भाजी, तळलेली भाजी हे पदार्थ मी छान बनवते. मी शुद्ध शाकाहारी होण्याचा निर्णय घेतल्यावर आमच्या घरी सुद्धा आता चिकन बनवत नाहीत. आई-बाबा, भाऊ-बहीण यांनी मला या निर्णयात खूप साथ दिली. आता रविवारी काय करायचं तर आमच्या घरी अळुवडी बनवतात, मशरूम पुलाव असं काय-काय आम्ही बनवतो.”
“आता माझ्या Comfort फूडबद्दल सांगायचं झालं, तर मला हिरव्या वाटाण्याची भाजी भयंकर आवडते. ती भाजी मी ३६५ दिवस खाऊ शकते. हिरवे वाटाणे मला खूप आवडतात.” असं पूजाने सांगितलं.
