Pooja Sawant Talks About Gashmeer Mahajani : पूजा सावंत मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं आतापर्यंत अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती ‘सालबर्डी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच तिचा हा नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामधून पूजाचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
पूजानं ‘सालबर्डी’ चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. १७ एप्रिलपासून हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानिमित्तानं पूजा सध्या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तिचा मित्र व लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनीचंही एक गाणं आहे. ‘सालबर्डी’मधील ‘जगदंबे’ या गाण्यात गश्मीरनं पारंपरिक पद्धतीचं नृत्य सादर केलं आहे. याबद्दल पूजा व गश्मीर दोघांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
पूजा सावंत व गश्मीर महाजनी दोघेही एकमेकांचे जवळचे मित्र-मैत्रिणी आहेत. दोघांनी एकत्र कामही केलं आहे. अशातच आता ‘सालबर्डी’ या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं दोघांनी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकमेकांबद्दल सांगितलं आहे. यावेळी पूजानं गश्मीरची बायको गौरी देशमुखकडे तक्रारही केलेली असं म्हटलं आहे. पूजा व गश्मीर एकमेकांबद्दल नेमकं काय म्हणाले आणि पूजानं गश्मीरबद्दल कोणती तक्रार केलेली याबद्दल जाणून घेऊयात…
पूजा सावंतनं गश्मीरची केलेली तक्रार
उल्लेख केलेल्या माध्यमाशी संवाद साधताना माझ्या अगदी काही मोजक्याच मैत्रिणी आहेत, त्यातली एक पूजा आहे. असं गश्मीर म्हणाला; तर पूजा गश्मीरबद्दल म्हणाली, “हा माझ्या अनेक नकारात्मक गोष्टी सांगत असतो. तो फक्त माझ्या नकारात्मक गोष्टीच सांगतो. त्याला जर काही नाही आवडलं तर अचानक काही महिन्यांनी त्याचा मेसेज येतो की हे बरं दिसत नाहीये वगैरे. मी म्हटलं, गश्मीरचा असा मेसेज? मग मी त्याच्या बायकोकडे त्याची तक्रार केली, म्हटलं की आवडत नाही सांगणं ठीक आहे, आपले मित्रच आपल्याला हे सांगतात. पण हे आवडतंय, हे छान केलंस असं काही नाही, फक्त नकारात्मक बोलत असतो.”
गश्मीर यावर त्याची बाजू मांडत म्हणाला, “नकारात्मक असं नाही, खरंतर तीन दिवसांपूर्वी आमचं याबद्दल बोलणं झालेलं. माझ्या बायकोचं, तिचं आणि माझं बोलणं सुरू होतं; मी सहज सांगत होतो की चांगलं ते चांगलंच आहे, ते सांगायची गरजच नाहीये, ते उत्तमच आहे; असो… असं असतं आमच्यामध्ये.” पुढे दोघांना तुम्ही एकमेकांसाठी कसे उभे राहता असं विचारल्यानंतर गश्मीर म्हणाला, “मी सल्ला दिला तर तिला असं वाटतं की मी तिच्यावर टीका करतोय.” पूजा यावर एक किस्सा सांगत म्हणाली, “आता काय होतं ते मी सांगणार नाहीये, पण एकदा मी ह्याला घेऊन गेलेली की गश्मीर बघ याबद्दल मला सांग, पण त्याला त्याचा राग आलेला. त्याने मला बुक्का मारलेला, तेव्हापासून मी त्याच्याकडे जाणं बंद केलं. आता मी गौरीकडे जाते. तिला सांगते गौरी असं झालंय.” गश्मीर महाजनीची बायको गौरी देशमुख पूजा सावंतची जवळची मैत्रीण आहे. तिच्याबद्दल अभिनेत्री अनेकदा बोलत असते.
दरम्यान, पूजा सावंतचे एप्रिल महिन्यात दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे दोन्ही चित्रपट खूप वेगळे असून पूजा दोन वेगळ्या भूमिकांमधून आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. तिचा ‘सखे गं साजणी’ हा चित्रपट ३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर अभिजीत खांडकेकर व प्रार्थना बेहेरे आहेत. त्यानंतर तिचा ‘सालबर्डी’ हा चित्रपट १७ एप्रिलला रिलीज होणार आहे, यामध्ये ती प्रमुख भूमिकेत आहे.
