Pooja Sawant Schooling and Fitness: पूजा सावंत लवकरच ‘सालबर्डी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. आता तिला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. याबरोबरच, पूजाच्या विविध मुलाखतींमधील वक्तव्यांची चर्चादेखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पूजाने नुकतीच ‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या बालपणाबद्दल सांगितले. ती म्हणाली, “मी मुंबईत जन्मले आहे. मी शालेय शिक्षण बालमोहन विद्यामंदिरमधून घेतलं. माझं कॉलेज एस आय डब्ल्यू हे होतं.”
पुढे ती म्हणाली, “बालमोहन विद्यामंदिरने आमच्यावर खूप चांगले संस्कार केलेत. माणूस कसा घडला पाहिजे. तो समाजात कसा वावरला पाहिजे, ते संस्कार बालमोहन विद्यामंदीरने आमच्यावर केले. याचं श्रेय मी शाळेला देईन. मराठी माध्यमात असल्यामुळे भाषेवर प्रभुत्व आलं. आम्हाला संस्कृत विषय तसेच, स्त्रोत्र पठन अनिवार्य होतं. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं अनिवार्य होतं. त्यामुळे मला वाटतं की ज्या पद्धतीने मी या चित्रपटसृष्टीत वावरते, त्याचं बऱ्यापैकी श्रेय बालमोहन विद्यामंदीरला आहे.
“मी बॅडमिंटनमध्ये राज्य स्तरापर्यंत…”
ती पुढे म्हणाली, “आमचा जो खेळाचा तास असायचा तो शिवाजी पार्कला असायचा. तिकडे बऱ्यापैकी खेळांची कसरत आमच्याकडून करून घेतली जायची. बऱ्याच लोकांना माहित नाहीये की, मी सांस्कृतिक विभागाप्रमाणे मी खेळात सुद्धा भाग घ्यायचे. मी खूप चांगली धावपटू होते. मी बॅडमिंटनमध्ये राज्य स्तरापर्यंत खेळले आहे. त्यामुळे धावणे, सायकलिंग यात पुढे होते. मला वाटतं की हे बऱ्याच लोकांना माहित नाही. लोकांना वाटतं मी फार नाजूक आहे. मी असे काही खेळ खेळत नसणार. पण, शाळेत असताना बऱ्यापैकी मी खेळात भाग घेत होते.”
पूजा असेही म्हणाली, “मी खेळात भाग घेत असल्याने ती शारीरिक ताकद माझ्यात लहानपणासूनच होती. मुळातच व्यायामाची आवड असल्याने, या क्षेत्रात काम करायला लागल्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने माझी दिनचर्या असते. हे सगळं शाळेकडून आलं आहे. कारण- हे शाळेत आमच्याकडून करून घेतलं आहे. तेव्हा मोबाईल, इंटरनेट अशा गोष्टी नव्हत्या. त्यामुळे शाळेतून आल्यावर आई नाश्ता बनवायची, त्यानंतर अभ्यास आणि त्यानंतर आम्ही बाहेर खेळायला जात असू. बाहेर खेळायला जाणं हे आपल्या पीढीने पाहिलेलं आहे. जे मी आताच्या मुलांचं बघते की ते शाळेतून येतात, अभ्यास करतात आणि मोबाईलवर गेम खेळत बसतात.”
पूजा सावंतने याआधी दिलेल्या काही मुलाखतींमध्ये तिच्या फिटनेसबद्दल सांगितले होते. ती लवकर उठते. सूर्योदयापूर्वी व्यायाम करते, असे पूजाने सांगितले होते.
