गणेशोत्सवाच्या निमित्ताने सेलिब्रिटीनींदेखील आपल्या कुटुंबाबरोबर बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी केली. बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छादेखील दिल्या होत्या. अशातच आता अभिनेत्री पूजा सावंत हिनं केलेल्या पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करीत काय म्हणाली पूजा सावंत ते जाणून घ्या..
मराठी सिनेेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. अभिनेत्री पूजा सावंतनं काही दिवसांपूर्वीच सिद्धेश चव्हाणबरोबर लग्नगाठ बांधली. पूजाचा पती सिद्धेश चव्हाण ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी करीत असल्यानं लग्नानंतरचे काही दिवस पूजा तिच्या पतीबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये राहत होती. मात्र, गणेशोत्सवाच्या निमित्तानं हे नवं दाम्पत्य आता मायदेशी परतलं आहे. या संदर्भात अभिनेत्रीनं पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी पसंती दिली आहे.
पूजानं तिच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाबरोबर कुटुंबाचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये खास गणेश चतुर्थीच्या निमित्तानं पूजानं महाराष्ट्रीयन लूक केल्याचं दिसत आहे. तिनं गुलाबी रंगाची साडी आणि त्यावर मराठी पारंपरिक दागिने परिधान केले होते; तर तिचा पती सिद्धेश यानंदेखील चॉकलेटी रंगाचा कुर्ता घातला आहे. या मराठमोळ्या लूकमध्ये पूजा नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होती. या फोटोंना कॅप्शन देत पूजा म्हणते, “गणपती बाप्पासोबत आम्हीही आमच्या घरी आलो, गणपती बाप्पा मोरया.” कुटुंबाशिवाय परदेशात काही दिवस राहिल्यानंतर पूजा आता तिच्या जवळच्या माणसांबरोबर गणेशोत्सवाचा आनंद घेताना दिसत आहे. पूजानं तिचे आई-वडील, सासू-सासरे, भावंडं व पती सिद्धेश यांच्याबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. संपूर्ण सावंंत आणि चव्हाण अशी दोन्ही कुटुंबं या फोटोत एकत्रितपणे गणरायाच्या आगमानाचा आनंद घेताना दिसत आहेत. या फोटोंना पसंती देत चाहत्यांनीदेखील पूजाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा- “भाच्याने घडवली मूर्ती अन् दोन्ही मुलांनी…”; अभिजीत केळकरच्या घरी बाप्पाचं आगमन, शेअर केला व्हिडीओ
अभिनेत्री पूजा सावंतनं मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर कमी काळातच लोकप्रियता मिळवली. सचित पाटील दिग्दर्शित ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून तिनं सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ‘बोनस’, ‘पोस्टर बॉईज’, ‘विजेता’, ‘बळी’, ‘नीलकंठ मास्तर’ या सिनेमांत तिनं मुख्य भूमिका साकारली होती. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जंगली’ या हिंदी चित्रपटात पूजा विद्युल जामवालबरोबर मुख्य भूमिकेत झळकली होती. मात्र, ‘दगडी चाळ’मध्ये पूजानं साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. एक गुणी अभिनेत्री असण्याबरोबरच पूजा सावंत उत्कृष्ट डान्सरदेखील आहे. काही मराठी डान्स रिअॅलिटी शोमध्ये पूजा परीक्षक म्हणून देखील पाहायला मिळाली.