Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंत गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘सालबर्डी’ सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमात पूजा पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. आजवर तिने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. पूजाने करिअरची सुरुवात ‘क्षणभर विश्रांती’ या मल्टीस्टारर सिनेमातून केली होती. करिअरच्या सुरुवातीपासूनच या इंडस्ट्रीत पूजाला खूप चांगले मित्र भेटले. प्रार्थना बेहेरे, भूषण प्रधान, गश्मीर महाजनी, वैभव तत्त्ववादी, अभिषेक जावकर हे सगळे पूजाचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. याच निखळ मैत्रीबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
पूजाने नुकतीच ‘आरपार- वुमन की बात’ या पॉडकास्टमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी तिने आयुष्यातील जवळचे मित्र, निखळ मैत्री यावर भाष्य केलं. रुपेरी पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांचं अनेकदा सहकलाकारांबरोबर नाव जोडलं जातं. हे पूजाच्या बाबतीत सुद्धा झालं होतं, पण एक मुलगा अन् मुलगी फक्त मित्र असू शकतात असं सांगत पूजाने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
पूजा सावंतला वैभव तत्त्ववादीबरोबरच्या मैत्रीबद्दल, त्यांच्या निखळ मैत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, “आमचं जे मित्रमंडळ आहे… आम्ही सगळेच कामाच्या बाबतीत खूप फोकस आहोत. सुरुवातीची काही वर्ष होती जेव्हा आम्ही एकमेकांना सल्ले द्यायचो. पण, आता आम्हाला एकमेकांबद्दल सगळंच माहिती आहे. एक काळजीचा जो फोन असतो…तो नेहमी आमच्यामध्ये होतो. वैभवने कधी माझा व्हिडीओ वगैरे पाहिला तर स्वत:हून फोन करून तो विचारतो, ‘सावंत थोडी स्ट्रेसमध्ये दिसतेस… काही आहे का?’ माझंही तसंच…सोशल मीडिया पाहून देखील आम्ही एकमेकांच्या आयुष्यात काय सुरूये हे ओळखू शकतो. इतकी सर्वांची छान मैत्री आहे.”
“ते मित्र माझं कुटुंब आहेत…”
“लोकांना नेहमी असं वाटतं की, एक मुलगा आणि एक मुलगी फक्त मित्र नसू शकतात. पण, हे माझ्या बाबतीत झालं नाही. माझे सगळे मित्र खूपच छान आहेत…आमची एकदम निखळ मैत्री आहे. मला असं नेहमी वाटतं मुली-मुलींच्या मैत्रीपेक्षा… एक मुलगा आणि एका मुलीची मैत्री जास्त छान होऊ शकते. मी याबाबतीत खूप जास्त लकी आहे. माझे सगळे मित्र याच क्षेत्रात आहेत. त्यामुळे आमच्या समस्या सारख्या होत्या, त्यावर आम्ही एकत्र उपाय शोधले…त्यामुळे मी स्वत:ला खूप लकी समजते. कारण, चित्रपटसृष्टीत लाभलेले हे सगळे मित्र आता फक्त माझे मित्र नाहीयेत…ते लोक माझं कुटुंब आहेत.” असं पूजा सावंतने सांगितलं.
दरम्यान, पूजाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर तिची प्रमुख भूमिका असलेला ‘सालबर्डी’ सिनेमा येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
