Pooja Sawant Village In Kokan : ‘दगडी चाळ’ चित्रपटातून घराघरांत लोकप्रिय झालेली महाराष्ट्राची ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. आजवर अनेक चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पूजा सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. अनेकदा पूजा तिच्या गावच्या घराचे, निसर्गरम्य वातावरणाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिला कोकणात जायला प्रचंड आवडतं. एखाद्या सिनेमाचं शूटिंग संपलं की, पूजा कोकणातील शांत वातावरणात जाऊन वेळ घालवते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या गावाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
पूजाचं गाव सिंधुदुर्गात आहे. कट्टा कुणकवळे हे तिच्या गावाचं नाव…याठिकाणी त्यांचं सुंदर, टुमदार घर आहे. पूजाच्या कुटुंबीयांनी कोकणातील निसर्गरम्य वातावरणात छोटंसं घर बांधलं आहे. पूजा म्हणते, “आमच्या सावंत कुटुंबाची कोकणात जमीन वगैरे आहे पण, ते सगळं बाजूला ठेऊन आम्ही जंगलात डोंगराच्या पायथ्याशी एक छोटंसं घर बांधलंय. अजिबात वाडा वगैरे नाही…आम्ही अगदी छोटंसं घर बांधलं आहे. तिथे मी आवर्जून जाते.”
पूजा सावंत ‘आरपार’च्या मुलखतीत म्हणाली, “कोकण म्हणजे स्वर्ग आहे आणि हे मी उगाच बोलत नाहीये. जे कोकणात राहतात त्यांना माहितीये कोकण म्हणजे काय आहे आणि किती सुंदर आहे. जेव्हा माझं शूट नसेल तेव्हा मी थेट कोकणात जाते. आमचं तिथे छान घर आहे, तिथे जाऊन मी राहते. कोकणात शांतता अनुभवता येते, अस्वच्छता नाहीये. तिथे निसर्गाला इतकं छान जपलं जातं… कोकणात गेल्यावर अगदी आईकडे गेल्यासारखं वाटतं…आईच्या कुशीत छान आपण आपलं आयुष्य जगतोय अशी ती भावना आहे. कोकणात गेल्यावर तणाव, दबाव, धकाधकीचं आयुष्य या सगळ्यापासून आपण फार दूर जातो…हे सगळे आजार गावी गेलं की, गायब होतात.”
“शहरात जे विनाकारण खर्च होतात…ते सुद्धा कोकणात गेल्यावर होत नाहीत. छान जेवण, शुद्ध हवा, सुर्योदयाला उठा आणि सूर्यास्ताला निजा…ही दिनचर्या अगदी बरोबर फॉलो करता येते. सिंधुदुर्गात कट्टाबाजार आहे… त्याच्याजवळ कुणकवळे नावाचं माझं गाव आहे. आमची भाषा आहे मालवणी…आणि ‘मी मालवणची चेडू आसंय…माका मालवणी येता..!’ आमची भाषा फार गोड आहे. मी वर्षातून दोन ते तीन वेळा गावी जाते…तुम्ही सुद्धा गावी जा… तुमचं गाव कोणतंही असो, तुम्ही गावी गेलं पाहिजे आणि आपण सर्वांनी आपल्या गावाला जपायला पाहिजे.”
दरम्यान, पूजाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, तिची मुख्य भूमिका असलेला ‘सालबर्डी’ सिनेमा येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये पूजा पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिका साकारणार आहे.
