Pooja Sawant Kokan Trip, Village : पूजा सावंतचं कोकणाबद्दलचं प्रेम आता जगजाहीर आहे. आपल्या व्यग्र शेड्युलमधून वेळ मिळाल्यावर पूजा आवर्जून कोकणात जाते. अनेकदा अभिनेत्री तिच्या गावच्या घराचे, निसर्गरम्य वातावरणाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिला गावी जायला प्रचंड आवडतं. एखाद्या सिनेमाचं शूटिंग संपलं की, पूजा कोकणातील शांत वातावरणात जाऊन वेळ घालवते.

पूजाचं गाव सिंधुदुर्गात आहे. कट्टा कुणकवळे हे तिच्या गावाचं नाव…याठिकाणी त्यांचं सुंदर, टुमदार घर आहे. नुकतीच पूजा तिच्या गावी गेली आहे. सध्या आंब्याचा सीझन सुरू असल्याने अभिनेत्रीने घरच्या आमराईची झलक व्हिडीओ शेअर करत सर्वांना दाखवली आहे. या व्हिडीओला पूजाने “कुठे असेन बरं मी” असं कॅप्शन दिलं आहे. खरंतर हा व्हिडीओतील आमराई पाहूनच पूजा कोकणात गेल्याचं अगदी पटकन लक्षात येतं.

पूजाने शेअर केलेल्या पुढील काही इन्स्टाग्राम स्टोरीजमधून तिची गावची दिनचर्या कशी आहे याचा अंदाज येतोय. अभिनेत्री साधारण पहाटे साडेपाच वाजता उठते. यानंतर पूजा योगा, वर्कआऊट करते…आणि कोकणातील सुंदर पहाट अनुभवते. त्यानंतर गरमागरम नाश्ता करून तिच्या दिवसाची सुरुवात होते. पूजाने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये तिच्या घरी आंबोळ्या बनवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

याशिवाय पूजाच्या गावच्या घराजवळ मांजरी, पाळीव श्वान आहेत. अभिनेत्री प्राणीप्रेमी असल्याने, पूजा यांची देखील अगदी प्रेमाने काळजी घेते. दुसऱ्या एका फोटोमध्ये गावी रात्रीचं चांदणं कसं पडतं, यादरम्यान आकाशाचं एक वेगळंच रूप पाहायला मिळतं याचीही झलक पूजाने दाखवली आहे. एकंदर ही मालवणी चेडू कोकणातील शांत वातावरणात एन्जॉय करतेय.

pooja sawant kokan trip
पूजा सावंतने शेअर केले गावचे फोटो ( Pooja sawant Kokan Trip )

पूजा कोकणाविषयी म्हणते, “कोकण म्हणजे स्वर्ग आहे आणि हे मी उगाच बोलत नाहीये. जे कोकणात राहतात त्यांना माहितीये कोकण म्हणजे काय आहे आणि किती सुंदर आहे. जेव्हा माझं शूट नसेल तेव्हा मी थेट कोकणात जाते. आमचं तिथे छान घर आहे, तिथे जाऊन मी राहते. कोकणात शांतता अनुभवता येते, अस्वच्छता नाहीये. तिथे निसर्गाला इतकं छान जपलं जातं… कोकणात गेल्यावर अगदी आईकडे गेल्यासारखं वाटतं…आईच्या कुशीत छान आपण आपलं आयुष्य जगतोय अशी ती भावना आहे. कोकणात गेल्यावर तणाव, दबाव, धकाधकीचं आयुष्य या सगळ्यापासून आपण फार दूर जातो…हे सगळे आजार गावी गेलं की, गायब होतात.”