गेल्यावर्षी बॉलीवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘सत्यप्रेम की कथा’. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन व अभिनेत्री कियारा अडवाणी झळकले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई केली होती. या सुपरहिट चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठमोळ्या समीर विद्वांस यांनी सांभाळली होती. ‘लोकमान्य’, ‘क्लासमेट्स’, ‘सायकल’, ‘डबल सीट’, ‘टाइम प्लीज’, ‘आनंदी गोपाळ’ यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणारे समीर विद्वांस आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे मराठी कलाकारांनी समीर विद्वांस व त्यांच्या होणाऱ्या पत्नीचं केळवण साजरं केलं आहे. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी जुईली सोनलकरबरोबर साखरपुडा केला होता. सोशल मीडियावर जुईलीने साखरपुड्याचा फोटो शेअर करून सगळ्यांनाच सुखद धक्का दिला होता. समीर विद्वांस यांची होणारी बायको देखील सिनेसृष्टीत काम करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांची मैत्री असून त्याचं प्रेमात रुपांतरित झालं आहे आणि आता अखेर दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे मराठी कलाकारांनी त्यांचं केळवण केलं आहे.

हेही वाचा – Video: आमिर-करीनाच्या गाण्यावर भर रस्त्यात थिरकले सखी गोखले-आशय कुलकर्णी, नेटकरी कौतुक करत म्हणाले…

अभिनेता हेमंत ढोमे, क्षिती जोग, चिन्मय मांडलेकर, नेहा मांडलेकर, लोकेश गुप्ते, चित्राली गुप्ते यांनी आपल्या कुटुंबासह समीर विद्वांस व जुईली सोनलकरचं केळवण केलं. याचे फोटो हेमंत ढोमे व लोकेश गुप्ते यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. तसंच या केळवणानिमित्ताने जुईलीने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट देखील शेअर केली आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/06/Lokesh-Gupta-Story.mp4

जुईलीने केळवणाचे काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये सर्वजण पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये केळवणासाठी केलेलं खास जेवण पाहायला मिळत आहे. यामध्ये वरण-भात, पोळी, बटाट्याची भाजी, श्रीखंड, गुलाब जामुन असे पंच पकवान ताटात दिसत आहे. तसंच तिसऱ्या फोटोमध्ये समीर व जुईलीचा गोड क्षण आहे. त्यानंतरच्या फोटोमध्ये दोघं एकमेकांना गुलाब जामून भरवताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत जुईलीने लिहिलं, “सुंदर थाळी सजवली गेली, स्वादिष्ट पदार्थ तयार केले गेले, भेटवस्तू मिळाल्या, उखाणे घेतले. या अत्यंत प्रेमळ लोकांनी आमचं केळवण साजरं करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. अगदी परिपूर्ण असं केळवण केलं. माझं तुमच्या प्रत्येकावर खूप प्रेम आहे. आमची रात्र खूप खास बनवण्यासाठी तुमचे खूप आभार.”

हेही वाचा – ‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या परीक्षणासाठी संकर्षण कऱ्हाडेने दिला होता नकार पण…; अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

जुईलीच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगली व्हायरल झाली आहे. आता समीर विद्वांस जुईलीबरोबर कधी लग्नबंधनात अडकणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.