प्राजक्ता कुलकर्णी यांनी ९० च्या दशकात मराठीसह अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. गोविंदा, जॅकी श्रॉफ, शिल्पा शेट्टी अशा लोकप्रिय कलाकारांबरोबर त्यांनी स्क्रीन शेअर केलीये. प्राजक्ता यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. करिअरच्या सुरुवातीलाच त्यांना नाना पाटेकर यांच्यासह काम करण्याची संधी मिळाली.
प्राजक्ता कुलकर्णी चंद्रशाळेच्या ( बालनाट्य शाळा ) विद्यार्थिनी होत्या. चंद्रशाळेची सुरुवात सुलभा देशपांडेंनी केली होती. यामाध्यमातून अनेक व्यावसायिक बालनाट्य सादर करण्यात आली. या कार्यशाळेत नाना पाटेकर सुद्धा मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी जायचे. तेव्हापासून प्राजक्ता कुलकर्णी नाना पाटेकरांना ओळखत होत्या, असं त्यांनी अभिजात मराठी फिल्मी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
प्राजक्ता कुलकर्णी सांगतात, “मी नानांना फार लहानपणापासून बघत आलेय…नानांबरोबर मी ‘पुरुष’ नाटकात काम केलं होतं. त्यात मी मथू ही लहानशी भूमिका साकारली होती. विजयाबाईंचं नाटक असल्याने मी लगेच त्या नाटकासाठी तयार झाले होते. नाना इतकं सुंदर काम करायचे…या सगळ्यांमुळे मला ‘पुरुष’ नाटकाच्या दरम्यान अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.”
माणूस म्हणून नाना पाटेकर कसे आहेत यावर प्राजक्ता कुलकर्णी म्हणाल्या, “नाना आजपर्यंत माझ्यावर कधीच चिडले नाहीत. कोणताही माणूस उगाच चिडत नाही. जेव्हा समोरची व्यक्ती काहीतरी चूक करते…तेव्हाच चिडचिड होते. मला असा अनुभव कधीही आला नाही.”
“नानांबरोबर काम करताना मला नेहमीच मजा आलीये, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. तेव्हा मी मालिकेत फार काम करत नव्हते. नानांबरोबर मी हिंदी ‘पुरुष’ नाटकात काम केलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, आपल्याला फक्त २५ प्रयोग करायचे आहेत. त्यानंतर आपला युएस दौरा आहे. त्यानंतर नाटकात काम करण्याचा फार योग आला नाही. पण, खरं सांगायचं झालं तर आताही नाटकात काम करण्याची मला खूप इच्छा आहे.” असं प्राजक्ता कुलकर्णी यांनी सांगितलं.
दरम्यान, प्राजक्ता कुलकर्णी ‘चार दिवस सासूचे’ या एव्हरग्रीन मालिकेत सुद्धा त्या झळकल्या आहेत. यासह सध्या त्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सायलीच्या सासुबाईंची भूमिका साकारत आहे.
