मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या कामाबरोबरच दैनंदिन आयुष्य, वैयक्तिक जीवनातील खास गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. प्राजक्ताने आज एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट खास तिच्या आई-वडिलांसाठी आहे.

आज (१० फेब्रुवारी रोजी) प्राजक्ता माळीच्या आई-वडिलांच्या लग्नाचा ४१ वा वाढदिवस आहे. यानिमित्त प्राजक्ताने त्यांच्याबरोबरचा एक खास फोटो पोस्ट केला. फोटोमध्ये प्राजक्ता आई-वडिलांचं औक्षण करताना दिसतेय.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई- पप्पा
४१ वर्षे पूर्ण झाली…
हे खरे कपल गोल आहेत
१०-०२-८५ ते १०-०२-२६, असं कॅप्शन प्राजक्ता माळीने फोटोला दिलं आहे. प्राजक्ताच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिच्या आई-वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Award Banner

प्राजक्ता माळीची पोस्ट

प्राजक्ताच्या कुटुंबाबद्दल माहिती

प्राजक्ता माळीच्या वडिलांचे नाव ज्ञानेश्वर माळी व आईचे नाव श्वेता माळी आहे. प्राजक्ताचे वडील सेवानिवृत्त सीआयडी अधिकारी आहेत. प्राजक्ताने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या वडिलांच्या कडक शिस्तीबद्दल आणि त्यांच्या पोलीस खात्यातील कामाबद्दल सांगितलं आहे. तर प्राजक्ताची आई श्वेता माळी या गृहिणी आहेत. प्राजक्ताच्या करिअरमध्ये तिच्या आईचा मोठा वाटा आहे. अगदी सुरुवातीच्या काळात डान्स क्लासला नेण्यापासून ते शूटिंगला जाण्यापर्यंत प्राजक्ताला आईची मदत झाली. तिला प्रसाद माळी नावाचा एक धाकटा भाऊ देखील आहे.

प्राजक्ताचे शिक्षण

मराठी अभिनेत्री आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्राजक्ता माळी हिचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ रोजी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे झाला. तिचे वडील नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाले, त्यामुळे तिचे बालपण पुण्यात गेले. प्राजक्ताने पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून भरतनाट्यममध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. प्राजक्ताने अभिनयविश्वात पदार्पण केल्यानंतर तिचा पुणे-मुंबई हा प्रवास सुरू झाला. प्राजक्ता शूटिंगमधून वेळ मिळाला की पुण्याला कुटुंबाबरोबर वेळ घालवते.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मालिका, चित्रपट आणि वेब सिरीज अशा तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. जुळून येती रेशीमगाठी, सुवासिनी, बंध रेशमाचे या तिच्या गाजलेल्या मालिका आहेत. प्राजक्ताने खो-खो, संघर्ष, हंपी, पार्टी, डोक्याला शॉट, पावनखिंड, चंद्रमुखी असे गाजलेले चित्रपट केले आहेत.