Prajakta Mali praises Kranti Redkar: क्रांती रेडकर दिग्दर्शित मैत्रेया हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. याआधी क्रांतीने दिग्दर्शित केलेला काकण हा सिनेमा लोकप्रिय ठरला. आता तिच्या या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.

“एखाद्या सुपरवुमनलाच…”

आता प्राजक्ता माळीने मैत्रेया सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिले, “क्रांती ताई, तू मला विविध प्रकारे प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं आहेस आणि हा सिनेमा त्याचेच आणखी एक उदाहरण आहे.”

पुढे ती म्हणाली, “तू जे काही करत आहेस, ते खरंच अविश्वसनीय आहे. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीमध्ये दिग्दर्शक म्हणून इतक्या खंबीरपणे आणि प्रभावीपणे आपलं स्थान निर्माण करणं, त्याचबरोबर दोन लहान जुळ्या मुलींची काळजी घेणं, ही काही साधी गोष्ट नाही, हे खरंच एखाद्या सुपरवुमनलाच जमू शकतं.

शेवटी तिने लिहिले, “ट्रेलर खूप आवडला, चित्रपटाला खूप यश मिळो या शुभेच्छा आहेत. आपल्यातलं मैत्रेया पण असच बहरत राहो.”

प्राजक्ताच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत, तर क्रांतीने लिहिले, “प्राजक्ता, थँक्यू सो मच. एक सक्षम महिला दुसऱ्या महिलेचं कौतुक करू शकते, खूप प्रेम.”

क्रांती रेडकर दिग्दर्शित मैत्रेया हा सिनेमा २० नोव्हेंबर २०२६ ला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, प्राजक्ता माळीदेखील लवकरच गौरी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार असून निर्माती म्हणून तिचा हा दुसरा चित्रपट असणार आहे.