महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज त्यांचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. वाढदिवसानिमित्त राज्यभरातून मनसेचे लाखो कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देत आहेत. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरेंवर आज शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कार्यक्रमांना राज ठाकरे आवर्जुन उपस्थित राहतात. याशिवाय मराठी चित्रपटांना चित्रपटगृहात हक्काचा शो टाइम आणि स्क्रिन्स मिळाव्यात यासाठी मनसेने अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळेच त्यांचे अनेक मराठी कलाकारांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आज प्राजक्ता माळीने खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ताने राज ठाकरे यांच्याबरोबरचे काही खास फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये ती राज ठाकरे यांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहे. यावेळी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील उपस्थित होत्या.

हेही वाचा : Video: गेली दोन वर्षे प्रेक्षक वाट पाहत असलेला क्षण अखेर येणार, ‘तुझेच मी गीत गात आहे’च्या महाअंतिम भागात घडणार ‘ही’ गोष्ट

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीची पोस्ट

प्राजक्ताने राज ठाकरेंबरोबरचे सगळे फोटो एका व्हिडीओच्या स्वरुपात शेअर केले आहेत. या फोटोंना तिने मनसे पक्षाचं अँथम गाणं जोडलं आहे. अभिनेत्री कॅप्शनमध्ये लिहिते, “आदरणीय ‘आपणांस’ वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा… राज ठाकरे जी… जे करण्याची इच्छा आहे, ते काम हातात यावं. काम करताना आनंद मिळावा. त्यातून समाधान लाभावं; या वाढदिवसानिमित्त तुम्हाला माझ्याकडून व ‘प्राजक्तराज परिवाराकडून’ शुभकामना. फोटोत दिसताय त्याप्रमाणे सदैव हसत रहा, प्रसन्न रहा. खूप शुभेच्छा.”

हेही वाचा : मित्रांचे अनुत्तरीत फोन, डोक्याला जखमा अन्…; चित्रपट रिलीजच्या आदल्या दिवशी संशयास्पद अवस्थेत आढळला अभिनेता प्रदीप विजयनचा मृतदेह

दरम्यान, प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्चा वर्षाव केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेले सर्व फोटो हे ‘प्राजक्तराज’ या तिच्या ज्वेलरी ब्रँडच्या लाँचिंगदरम्यानचे आहेत.

राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ‘प्राजक्तराज’च्या लाँचिंग कार्यक्रमाला हजेरी लावली होती. याशिवाय प्राजक्ताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका निभावत आहे. तसेच भविष्यात काही लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये देखील प्राजक्ता झळकणार आहे.