Sai Tamhankar & Prajakta Mali : प्राजक्ता माळी यंदा ७९ व्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झाली होती. तिने मोरपिशी रंगाची नऊवारी साडी नेसून कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली होती. प्राजक्ताच्या या मराठमोळ्या रुबाबदार लूकचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं. पण, काही लोकांनी तिला विनाकारण ट्रोलही केलं. याबाबत सई ताम्हणकरने एका मुलाखतीत तिचं स्पष्ट मत मांडत या ट्रोलर्सना खडेबोल सुनावले होते. तसंच प्राजक्ताचं भरभरून कौतुकही केलं.

सईने भर मुलाखतीत कौतुक केल्यावर आता प्राजक्ता माळीने तिचे आभार मानत एक खास पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ता म्हणते, “…आणि म्हणूनच सई आम्ही सगळे तुला बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटीफूल म्हणतो! सई…तुला खूप प्रेम. कारण, एक स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहते…इथूनच खऱ्या स्त्री सक्षमीकरणाची सुरुवात होते.”

“अशा बाबतीत अनेकजण काहीच बोलत नाहीत. त्यांनी गप्प राहणं पसंत केलं, तर काहींनी फक्त तोंडावर कौतुक केलं आणि माझ्या पाठीमागे वेगळंच वागले. जे लोक काहीही झालं तरी आपलं स्पष्ट मत मांडतात अशा सगळ्यांचा मी कायम आदर करते आणि यापुढेही करत राहीन.” असं प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सई ताम्हणकर काय म्हणाली होती?

लाडक्या मैत्रिणीला पाठिंबा देत सई ताम्हणकर म्हणाली होती, “एक गोष्ट मी आवर्जून नमूद करते…मला प्राजक्ता माळीचा खूप-खूप अभिमान आहे. मला असं वाटतं…ज्या सुंदर पद्धतीने तिने स्वत:ला कान्सच्या रेड कार्पेटवर सादर केलं, ते खूप भारी होतं. अर्थात ज्यामुळे खूप लोकांना मिरची लागलेली आहे कारण, तिच्याकडे खूप लोकांचं लक्ष आहे…आणि मला तुझा खूप अभिमान वाटतोय प्राजक्ता! माणसं काहीही केलं तरी बोलतात, आता तक्रारी करण्यापेक्षा एखाद्याचं यश आपण सेलिब्रेट केलं पाहिजे.”

prajakta mali sai
प्राजक्ता माळीची सईसाठी खास पोस्ट

दरम्यान, रेड कार्पेटवर एन्ट्री घेतल्यावर प्राजक्ताच्या चेहऱ्यावर प्रेक्षकांना कमालीचा आत्मविश्वास पाहायला मिळाला. मोरपिशी रंगाची नऊवारी साडी, त्यावर भरजरी शेला, गळ्यात ठुशी, हातात मराठमोळे तोडे, कमरपट्टा असा पारंपरिक साज करून प्राजक्ता कान्सच्या रेड कार्पेटवर चालली.