Prajakta Mali Vegan Lifestyle: मराठी कलाविश्वाची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट करत स्वतः व्हिगन झाल्याचे जाहीर केले आहे. रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांसारख्या दिग्गज सेलिब्रिटींनंतर आता प्राजक्तानेही हा मार्ग निवडल्याने व्हिगन जीवनशैलीची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. व्हिगन म्हणजे वनस्पतींवर आधारित असा आहार, ज्यामध्ये मांस, अंडी, मासे याबरोबरच प्राण्यांपासून मिळणारे सर्व पदार्थ पूर्णपणे टाळले जातात. व्हिगन म्हणजे नेमकं काय? शाकाहार व व्हिगन यात काय फरक असतो? व्हिगन होण्यामागची कारणं कोणती? याबद्दल जाणून घेऊयात.

 प्राजक्ता माळीची पोस्ट

“आज सकाळी सिद्धिविनायक आणि आई तळजाई माता यांचे दर्शन घेतले आणि या क्षणापासून मी व्हिगन (Vegan) होण्याचा निर्णय घेतला आहे. मर्जीने नाही, तर सक्तीने. माझं शरीर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ स्वीकारत नाहीये, त्यामुळे मला सतत खोकला येत होता. त्यामुळे यापुढे मी कॉफी आणि चहाला नकार दिला, आश्चर्य वाटून घेऊ नका. माझे शरीर सर्व “तामसिक” गोष्टी नाकारत आहे. त्यामुळे मी अधिकृतपणे, आतापासून क्रूरतामुक्त झाले आहे. फक्त काही खोटं बोलणाऱ्या आणि फसवणाऱ्या लोकांना वगळता,” अशी पोस्ट प्राजक्ता माळीने केली आहे.

व्हिगन म्हणजे काय?

व्हिगन म्हणजे अशी जीवनशैली किंवा आहारपद्धती, ज्यामध्ये कोणत्याही प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांचा वापर पूर्णपणे टाळला जातो. व्हिगन होणं हा फक्त आहाराचा नियम नसून प्राण्यांना इजा न पोहोचवता पूर्णपणे वनस्पतींवर आधारित जीवनशैली स्वीकारणं आहे. 

व्हिगन आहारात काय टाळले जाते?

व्हिगन असणारे लोक मटण, मासे, चिकन आणि अंडी, गाई-म्हशीचे दूध, दही, ताक, तूप, लोणी, चीज, पनीर आणि मध याचे सेवन करत नाहीत. इतकंच नाही तर व्हिगन व्यक्ती लेदर कपडे/बूट, रेशीम, लोकर, तसेच अॅनिमल टेस्टिंग केलेले कॉस्मॅटिक्स वापरणे पूर्णपणे टाळतात. 

व्हिगन आहारात काय खाल्ले जाते?

सर्व प्रकारची फळे आणि भाज्या, धान्ये, कडधान्ये, सुका मेवा, वनस्पतींपासून बनवलेले दूध (सोया दूध, बदाम दूध, नारळाचे दूध, ओट्स दूध) आणि त्यापासून बनवलेले दही/चीज खाल्ले जाते. तसेच टोफू व्हिगन आहारात खाल्ले जाते. 

व्हिगन व शाकाहार यातील फरक काय?

शाकाहारी लोक मांस-मासे खात नसले तरी दूध, दही, तूप, लोणी, चीज आणि मध यांसारखे प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ खातात. पण व्हिगन लोक दुग्धजन्य पदार्थांसह प्राण्यांपासून मिळणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा आहारात समावेश करत नाहीत. 

prajakta-mali-vegan-diet-lifestyle-meaning
फोटो – AI

सेलिब्रिटी व्हिगन लाइफस्टाइल का स्वीकारत आहेत?

फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार, क्रीडा आणि ग्लॅमर जगतातील अनेक सेलिब्रिटींनी व्हिगन जीवनशैली स्वीकारली आहे, त्यामागची काही कारणं खालीलप्रमाणे-

फिटनेस : सेलिब्रिटींना त्यांच्या कामासाठी एनर्जी पाहिजे असते, त्याचबरोबर शारीरिक फिटनेस टिकवून ठेवावा लागतो. व्हिगन आहार पचायला हलका असतो, त्यामुळेही सेलिब्रिटी व्हिगन लाइफस्टाइल स्वीकारतात. 

वजन नियंत्रण आणि त्वचेचे सौंदर्य : दुग्धजन्य पदार्थ बंद केल्याने त्वचेवरील पुरळ/पिंपल्स कमी होण्यास आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होते. तसेच चयापचय सुधारून वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते.  

प्राण्यांवरील प्रेम : ऑस्करविजेता जोक्विन फिनिक्स, अरियाना ग्रँडे, बॉलीवूडमधील कंगना रणौत, आमीर खान, आलिया भट्ट, जॅकलीन फर्नांडिस  यांसारख्या सेलिब्रिटींनी प्राण्यांवरील प्रेम आणि पर्यावरणाविषयीची बांधिलकी यांमुळे व्हिगन लाइफस्टाइल स्वीकारली आहे. आपल्या लोकप्रियतेचा वापर करून समाजात चांगला संदेश देणे हाही यामागील एक उद्देश असतो.