प्रार्थना बेहेरे नेहमीच विविधांही भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. मालिका असो अथवा चित्रपट; तिने तिच्या सहज-सुंदर अभिनयाने नेहमीच सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. प्रार्थना सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असते. मात्र, तुम्हाला तुम्हाला माहितीये का प्रार्थना मुंबईत राहत नाही. काही वर्षांपूर्वीच ती आपल्या पतीसह अलिबागला शिफ्ट झाली आहे.
मुंबईपासून दूर अलिबागला राहायला जाण्याचा निर्णय का घेतला? आणि जेव्हा प्रार्थना अभिनय करत नसते, तेव्हा काय करत असते? असा प्रश्न तिला आरपारच्या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, “आता माझ्या घरी एकूण १२ श्वान आहेत. या सगळ्यांबरोबर मी फार्महाऊसवर खूप खेळते. यांच्याबरोबर दिवस कसा जातो खरंच मला कळत नाही. जेव्हा मी अलिबागला असते तेव्हा मी अभिनेत्री नसते…तेव्हा मी त्यांची आई असते. अलिबागला मी माझं आयुष्य आनंदात आणि शांतपणे जगते आणि खरं सांगू मला तसंच आयुष्य हवं असतं.”
प्रार्थना पुढे म्हणाली, “कोव्हिडनंतर मला एक गोष्ट समजली ती म्हणजे, आपण कधीही जगणं विसरलं नाही पाहिजे, आपल्या कुटुंबासाठी वेळ काढला पाहिजे. जेव्हा आम्ही मुंबईत होतो तेव्हा अभी माझा नवरा सकाळी आठ ऑफिसला जायचा…ते रात्री त्याला येईपर्यंत १२ वाजायचे. मी सुद्धा शूट वगैरे संपवून रात्री उशिरा घरी यायचे. त्यामुळे आम्हाला एकमेकांसाठी वेळ मिळत नव्हता. आता काय झालंय…जेव्हा आम्हाला काम असतं तेव्हा आम्ही मुंबईत चार दिवस असतो तेव्हा काम करतो आणि तीन दिवस शुक्रवार, शनिवार आणि रविवार आम्ही अलिबागला जातो.”
“घरी असताना फक्त कुटुंबाला वेळ द्यायचा हे आम्ही ठरवलं आहे. कारण, अलिबागला मी माझ्या सासू-सासऱ्यांबरोबर राहते. त्यांच्याबरोबर छान वेळ घालवता येतो..गप्पा मारता येतात. आयुष्याला एक वेगळी शिस्त लावण्यासाठी आम्ही मुद्दाम हा निर्णय घेतला आणि मग अलिबागला शिफ्ट झालो.” असं प्रार्थनाने सांगितलं.
“माझं अरेंज मॅरेज आहे आणि अभी सुद्धा आपल्याच फिल्डमध्ये आहे. साऊथमध्ये त्याने अनेक चित्रपट दिग्दर्शित केलेत आणि आता तो मराठी चित्रपटांसाठीही काम करतोय. एकाच फिल्डमध्ये असल्यामुळे त्याला माझं काम माहितीये. आम्ही दोघंही एकमेकांना खूप छान समजून घेतो” असंही प्रार्थनाने यावेळी सांगितलं.

