Prarthana Behere on Kedar Shinde: प्रार्थना बेहेरे नुकतीच ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासुबाई?’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर निर्मिती सावंत प्रमुख भूमिकेत आहे.

निर्मिती सावंत यांनी सासूची, तर प्रार्थनाने सूनेची भूमिका साकारली आहे. मनस्वी असे प्रार्थनाच्या पात्राचे नाव आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

आता प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने केदार शिंदेबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. तिने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिने, “केदारसर हे उत्तम निर्माते, उत्तम दिग्दर्शक आणि उत्तम माणूस आहेत.”

“तुमच्याबरोबर काम करण्याचा अनुभव…”

तिने केदार शिंदेंना उद्देशून लिहिले, “तुमच्याबरोबर काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी खरंच अविस्मरणीय आहे. मला तुमच्या चित्रपटाचा एक भाग बनवल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल खूप खूप थँक्यू.”

पुढे तिने लिहिले, “मी फक्त तुमची दृष्टी, तुमची शैली, तुमचे विचार आणि तुमची कामाची शिस्त फॉलो केली; पण या प्रक्रियेत मी कलाकार म्हणून आणि माणूस म्हणूनही खूप काही शिकले. तुमचं मार्गदर्शन, तुमची मेहनत, तुमची प्रामाणिकता आणि कलाकारांबद्दलचा तुमचा आदर हे सगळं खूप प्रेरणादायी आहे.”

प्रार्थनाने लिहिले, “या खास भूमिकेसाठी आणि मनस्वी देसाईंसारखं सुंदर पात्र मला दिल्याबद्दल विशेष आभार. तुमच्याबरोबर पुन्हा पुन्हा काम करण्याची इच्छा आहे. तुम्हाला खूप प्रेम आणि तुमच्याप्रति मनात खूप सारा आदर आहे”, असे लिहित तिने कृतज्ञता व्यक्त केली.

प्रार्थनाच्या या पोस्टवर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे. केदार शिंदे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेले अनेक सिनेमे मोठ्या प्रमाणात गाजले आहेत. २०२३ साली प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा त्यापैकीच एक आहे. ‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘खो-खो’, ‘येड्यांची जत्रा’ या सिनेमांसाठीदेखील केदार शिंदे ओळखले जातात.

दरम्यान, प्रार्थना अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई या चित्रपटानंतर सखे गं साजणी या चित्रपटाद्वारे ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पिक्चर पाहायला मिळाले होते. आता चित्रपटात कोणती गोष्ट पाहायला मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.