‘पवित्र रिश्ता’सारख्या गाजलेल्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारून प्रार्थना बेहेरेने मनोरंजनविश्वात पदार्पण केलं होतं. अभिनय क्षेत्रात जम बसवल्यावर वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्रीने २०१७ मध्ये अभिषेक जावकरशी लग्न केलं. अभिषेक व प्रार्थना यांचं अरेंज मॅरेज आहे. अभिषेक जावकर हा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता म्हणून ओळखला जातो.
अभिषेक व प्रार्थनाने लग्नानंतर वैयक्तिक आयुष्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतलाय, याबद्दल अभिनेत्रीने ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
प्रार्थना म्हणते, “लहानपणापासून मला प्राणी खूप आवडतात. पण, आम्ही कधी घरी श्वान पाळला नव्हता. आमच्या शेजारच्या काकांकडे एक पाळीव श्वान होता. त्याच्या निधनानंतर ते काका-काकू खूप रडले होते. त्यांना एवढा त्रास का झाला असेल…ही गोष्ट मला तेव्हा समजली नव्हती पण, आज कळतेय. कारण, माझ्या घरी सुद्धा आम्ही खूप प्राणी पाळले आहेत. प्राण्यांच्या डोळ्यात एक वेगळंच प्रेम असतं. त्यांचं प्रेम खूप नि:स्वार्थ असतं. एकवेळ लहान मुलांना आपल्या आई-बाबांकडून अपेक्षा असतात की, तुम्ही माझ्यासाठी हे करावं, ते करावं. अगदी माझ्याही माझ्या आई-बाबांकडून अपेक्षा होत्या. पण, मी घरी पाळलेल्या प्राण्यांना माझ्याकडून काहीच अपेक्षा नाहीयेत. त्यांना फक्त माझं प्रेम हवंय आणि हे खरंच शिकण्यासारखं आहे.”
“आमच्या घरी खूप पाळीव प्राणी आहेत आणि त्या सगळ्यांवर माझं खूप प्रेम आहे. मी आणि अभीने जाणीवपूर्वक एकमेकांशी चर्चा करून असा निर्णय घेतलाय की, आता आम्हाला मूल नकोय. आमच्या घरचे पाळीव श्वान हिच सगळी आमची मुलं आहेत आणि आपण त्यांना प्रेम द्यायचं हे आम्ही ठरवलंय. ज्यांच्याकडे पाळीव प्राणी असतील…त्यांना कळत असेल मला नेमकं काय म्हणायचंय. प्राण्यांचं जे नि:स्वार्थ प्रेम असतं ते वेगळंच आहे.” असं प्रार्थनाने यावेळी सांगितलं.
काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत प्रार्थना या निर्णयाबद्दल म्हणाली होती, “माझ्या नवऱ्याला आणि मला प्राणी खूप आवडतात. त्यामुळे आम्हाला मूल नको असं आम्ही ठरवलं होतं. आता आमच्या घरी जे प्राणी आहेत…ती सगळी आमची मुलं आहेत आणि आम्ही दोघंही त्या सगळ्यांची खूप जास्त काळजी घेतो, त्यांना सांभाळतो. मूल होऊ न देण्याचा निर्णय मोठा होता पण, यात आमच्या घरच्या दोन्ही कुटुंबांनी आम्हाला पाठिंबा दिला, समजून घेतलं. माझे सासू-सासरे, आई-बाबा दोन्ही कुटुंबांनी हा निर्णय आमच्यावर सोडला होता. माझ्या नवऱ्याचं प्राण्यांवर प्रचंड प्रेम आहे. घरातील एका श्वानाला जरी काही झालं तरी आम्ही दोघंही बैचेन होतो. त्या मुक्या जनावराला आपली जास्त गरज आहे त्यामुळे त्यांच्यासाठी जगूया असा विचार आम्ही केला आहे.”
