Prasad Oak Achievements : मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओकने एक आनंदाची बातमी त्याच्या सर्व चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात प्रसादने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. प्रसादने या भूमिकेला योग्य न्याय दिला असं म्हणत सर्वत्र त्याचं भरभरून कौतुक करण्यात आलं होतं. ‘धर्मवीर’साठी प्रसाद ओकला त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे जवळपास सगळेच पुरस्कार मिळाले. आता या विशेष कामगिरीची नोंद जागतिक रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. हे दोन विश्वविक्रम नेमके काय आहेत याबद्दल प्रसादने स्वत: माहिती दिली आहे.
प्रसाद भावना व्यक्त करत म्हणाला, “१३ मे २०२२ यादिवशी धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा सिनेमा किती यशस्वी झाला हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्या वर्षात मला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे एक-एक करून सगळे पुरस्कार मिळाले. खरंतर, इतक्या पुरस्कारांची मला सवय नव्हती. मी बरीच वर्षे या पुरस्कारांची वाट पाहत होतो पण, मला काही केल्या पुरस्कार मिळत नव्हते. पण, या चित्रपटाच्या निमित्ताने मला अनेक पुरस्कार मिळाले. तेव्हा मला एक गोष्ट जाणवली नव्हती की, या पुरस्कारांची संख्या नेमकी किती आहे…किंवा प्रत्येक पुरस्कार मला मिळतोय हे माझ्या लक्षात आलं नव्हतं. पण, जसं वर्ष संपलं…तसं माझ्या लक्षात आलं की..त्यावर्षीचे सगळे पुरस्कार मला ‘धर्मवीर’ चित्रपटासाठी मिळाले आहेत.”
दोन विश्वविक्रमांची नोंद
“या सगळ्या पुरस्कारांचं महत्त्व मला आज प्रकर्षाने जाणवतंय कारण, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘ग्लोबल बुक ऑफ Excellence इंग्लंड रेकॉर्ड’ या दोन्ही रेकॉर्ड्समध्ये माझ्या या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. मी मराठीतला एकमेव कलाकार आहे ज्याला एका वर्षातील, एकाच सिनेमासाठी सर्वाधिक पुरस्कार मिळालेत. या दोन विश्वविक्रमांची माझ्या नावावर नोंद झालेली आहे. एका मराठी चित्रपटामुळे हा क्षण माझ्या वाट्याला आला याचा मला नितांत अभिमान आहे.”
“या क्षणी मला निर्माते मंगेश देसाई, चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, माझी धर्मवीरची संपूर्ण टीम या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. ज्या-ज्या संस्थांनी मला पुरस्कार दिले त्यांचे आभार आणि अर्थातच सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार! धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हतं…त्यांचा मी कायम ऋणी आहे.” अशा भावना प्रसाद ओकने व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, प्रसाद ओकने शेअर केलेल्या पोस्टवर मराठी कलाकारांनी कौतुकाचा अन् शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्याने एक लहानसा कार्यक्रम आयोजित करून त्याच्या दोन्ही जागतिक पुरस्कारांची झलक सर्वांना दाखवली आहे. या खास प्रसंगी त्याची पत्नी मंजिरी ओक देखील उपस्थित होती.

