अमेरिकेत पार पडलेल्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (नाफा) मराठी चित्रपट महोत्सवाच्या मंचावर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी रंगतदार गप्पा मारल्या. या सोहळ्यात पार पडलेल्या ‘कॉफी विथ कौशिक’ या कार्यक्रमात अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने आपल्या अभिनयाच्या प्रवासासह आगामी भूमिकेबद्दल मोकळेपणानं भाष्य केलं आहे. अजित पवार यांच्या जीवनावर आधारित आगामी चित्रपटात अजितदादांची भूमिका साकारण्याची आपली मनापासून इच्छा असल्याचं प्रसादनं यावेळी स्पष्ट केलं.
“मला कशाचीही भीती वाटत नाही…”
‘धर्मवीर’ चित्रपटात स्वर्गीय आनंद दिघे यांची भूमिका हुबेहूब साकारून प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या प्रसाद ओकला राजकीय भूमिकेबाबत विचारण्यात आलं. एका राजकीय व्यक्तिमत्त्वाची भूमिका केल्यानंतर कलाकारावर त्या विशिष्ट पक्षाचा शिक्का बसतो, याची भीती वाटली नाही का? या प्रश्नावर उत्तर देताना प्रसाद म्हणाला, “मला कशाचीही भीती वाटत नाही. भीती वाटली असती तर मी कलाकारच झालो नसतो. प्रत्येक अभिनेता हा नेहमीच एका चांगल्या भूमिकेच्या शोधात असतो. जवळपास ९५ चित्रपट केल्यानंतर मला ‘धर्मवीर’च्या रूपाने ती सुवर्णसंधी मिळाली.”
“विचारधारेपेक्षा अभिनेत्यासाठी भूमिका जास्त महत्त्वाची…”
विचारधारेपेक्षा अभिनेत्यासाठी भूमिका जास्त महत्त्वाची असते, असे सांगत प्रसादने आगामी भूमिकांबाबत सूचक विधान केले. दिग्दर्शक प्रवीण तरडे सध्या अजित पवार यांच्या जीवनावर चित्रपट बनवत असून, त्यात ‘दादां’ची भूमिका साकारायला नक्कीच आवडेल, असे तो म्हणाला.
“प्रवीण तरडे फार कुचकट….”
मात्र, ही भूमिका आपल्याला मिळेल की नाही, याबद्दल अनिश्चितता व्यक्त करत प्रसादने मिश्कीलपणे जोडले, “प्रवीण तरडे फार कुचकट आहे. त्याचं सगळं अगदीच पर्टिक्युलर झाल्याशिवाय तो काही करत नाही… तरीही मी माझी तयारी सुरू केली आहे. अजितदादांसारखा लूक आणि गेटअप करून मी प्रवीणला काही फोटोही पाठवले आहेत.” प्रसाद ओकच्या या वक्तव्यानंतर आता प्रवीण तरडे यांच्या अजित पवारांवरील चित्रपटात मुख्य भूमिकेत कोण दिसणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
