Prasad Oak Manjiri Oak Viral Reel : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडींमध्ये अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक आणि अभिनेत्री मंजिरी ओक यांचे नाव आवर्जून घेतले जाते. त्यांच्या चित्रपटांसह सोशल मीडियावरही मंजिरी व प्रसाद यांची जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. नवरा-बायकोच्या नात्यातील भांडण, मजेशीर प्रसंग आणि रुसवा-फुगवा हे ते रील्समधून मांडत असतात. आता नुकतीच प्रसाद-मंजिरी यांनी भन्नाट रील शेअर केली असून यावर कलाकारांनी मिश्कील कमेंट्स केल्या आहेत.
प्रसाद-मंजिरी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रसाद कपड्यांच्या घड्या घालत असतो तर मंजिरी सोफ्यावर बसलेली असते. यावेळी तिला फोन येतो आणि रात्री भेटण्याचा प्लॅन करण्याबद्दल विचारतात. यावर मंजिरी म्हणते, “आज रात्री…पण किती वाजता…? रात्री ९ वाजता. बरं..बरं..थांब जरा, मी याबाबत जरा प्रसादला विचारते. मी प्रसादला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. मी त्याला विचारल्याशिवाय बाहेरसुद्धा जात नाही. त्याला विचारेपर्यंत जरा होल्ड कर.”
मंजिरी प्रसादची परवानगी न घेता देते होकार
मंजिरीचा हा फोनवरचा संवाद ऐकून तिच्यामागे उभा असलेला प्रसाद आनंदी होतो आणि मंजिरी आता त्याला रात्रीच्या प्लॅनबद्दल विचारणार, असे त्याला वाटते. यावर तो प्लॅनसाठी नकार देणार असतो, पण फोन होल्डवर ठेवल्यानंतरही मंजिरी त्याला कोणतीही परवानगी विचारत नाही. ती सोफ्यावर बसून कॉफी पित राहते. प्रसाद तिला जाण्यासाठी नकार देणार असतो, पण त्याला न विचारताच पुन्हा फोनवर बोलून, ‘हो जाऊयात, प्रसाद जा म्हणाला’ असे उत्तर देते.
प्रसादला रात्रीच्या प्लॅनबाबत एक प्रश्नही न विचारताच मंजिरीने त्याचा होकार असून प्लॅन होणार असल्याचे सांगितले. यामुळे प्रसाद थक्क होतो आणि आश्चर्याने बायकोकडे पाहत राहतो. यावेळी प्रसादच्या भन्नाट एक्स्प्रेशन्समुळे या रीलची मजा आणखी वाढली आहे. हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “आपल्याला सांगितलं आहे की पती म्हणजे परमेश्वर.”
प्रसाद ओक व मंजिरी ओक यांच्या या मजेशीर रीलवर कलाकारांसह नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यावर अभिनेता आदिनाथ कोठारे व अमृता खानविलकर यांनी हसायच्या इमोजी कमेंट केल्या आहेत, तर एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्ही माझी सर्वांत आवडती जोडी आहात.” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “ताई, तू एकदम माझ्यासारखीच आहे. मी माझ्या अहोंची अशीच परवानगी घेते.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “ही तर घर घर की कहानी हैं.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “ताई, किती आज्ञाधारक आहे, प्रसाद खूप लकी आहे.”
