Prasad Oak On Dharmaveer 3: ‘धर्मवीर’ व ‘धर्मवीर २’ हे दोन्ही मराठी चित्रपट प्रचंड गाजले. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. मंगेश देसाईंनी या चित्रपटांची निर्मिती केली आहे. २०२० मध्ये धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता; तर २०२३ मध्ये धर्मवीर २ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

“‘धर्मवीर’ चित्रपटासाठी मला १७ पुरस्कार मिळाले असले तरी…”

चित्रपटात प्रसाद महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्याने आनंद दिघेंची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेसाठी त्याला त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे जवळजवळ सगळेच पुरस्कार मिळाले. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘ग्लोबल बुक ऑफ Excellence इंग्लंड रेकॉर्ड’ या दोन्ही रेकॉर्ड्समध्ये प्रसाद ओकच्या या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे.

आता अभिनेत्याने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, “‘धर्मवीर’ चित्रपटासाठी मला १७ पुरस्कार मिळाले असले तरी माझं नॅशनल अवॉर्ड माझं हुकलं याची एक अभिनेता म्हणून थोडीशी खंत आहे.”

Award Banner

“दिग्दर्शक म्हणून तो पुरस्कार मला ‘कच्च लिंबू’साठीच मिळाला; पण अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा. पण, अजून वेगळ्या चित्रपटासाठी मी जिद्दीनं प्रयत्न करेन. अजून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन आणि एक अभिनेता म्हणून मी राष्ट्रीय पुरस्कार मिळवीन. इतकं काम करण्याची नक्कीच इच्छा आहे. मला ऑस्करची फार अशी आशा नाही. कारण- तो परदेशातील पुरस्कार आहे; पण आपल्या देशातील जो सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहे, तो मला मिळवायचा आहे.”

‘धर्मवीर ३’ कधी येणार, त्याची तयारी सुरू आहे का? यावर अभिनेता म्हणाला, “अजून माझ्या कानावर तर काही नाही; पण मंगेश देसाईच्या मनात असेल, तर तो लवकरात लवकर त्याची घोषणा करेल. कारण- प्रवीण आता देऊळ बंद २ या चित्रपटामध्ये व्यग्र आहे. मंगेश त्याच्या इतर कामांमध्ये व्यग्र आहे. बऱ्याच चित्रपटांमध्ये मंगेश अभिनयही करत आहे. त्यामुळे त्यातून जेव्हा ते दोघे मोकळे होतील, तेव्हा ते दोघे ठरवतील आणि घोषणा करतील; पण हा चित्रपट व्हायला हवा, असं मला वाटतं.”

‘महापरिनिर्वाण’ ते ‘निळू फुले’ बायोपिक

आगामी चित्रपटांबद्दलही अभिनेत्याने या मुलाखतीत वक्तव्य केले. आता मी सध्या एका चित्रपटाची वाट बघतोय. खूप मोठा चित्रपट आहे. महापरिनिर्वाण हा चित्रपट आहे. त्यामध्ये माझी महत्त्वाची भूमिका आहे. खूप महत्त्वाचा चित्रपट आहे. तो कधी येतोय, याची मी वाट बघतोय. त्यानंतर एफआयआर ४६९ नावाचा मी चित्रपट केला आहे. त्याबरोबरच वारी नावाचा एक चित्रपट केला आहे.

अभिनेता पुढे असेही म्हणाला, “दोन-तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. दिग्दर्शक म्हणूनसुद्धा पुढच्या वर्षी निळू फुलेंच्या बायोपिकचे काम सुरू होईल. ‘भद्रकाली’ चित्रपटाचे काम सुरू होईल”, असे म्हणत अभिनेता-दिग्दर्शक म्हणून आगामी काळात कोणते चित्रपट येणार आहेत, याची प्रसादने थोडक्यात कल्पना दिली.