मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक लोकप्रिय मराठी कलाकारांच्या मुलांनी आयुष्यात एक नवीन सुरुवात केली आहे. अलीकडेच आदेश व सुचित्रा बांदेकर यांचा एकुलता एक मुलगा सोहम बांदेकर लग्नबंधनात अडकला. आता या पाठोपाठ प्रसाद ओकच्या मोठ्या मुलाचा साखरपुडा पार पडला आहे.
प्रसाद ओकचा मोठा मुलगा सार्थकचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. अमृताने शेअर केलेल्या फोटोमध्ये संपूर्ण ओक कुटुंबीयांची आणि प्रसाद-मंजिरीच्या होणाऱ्या सुनेची झलक देखील पाहायला मिळत आहे.
प्रसाद ओकच्या होणाऱ्या सुनेचं नाव आहे रितू. अमृताने फॅमिली फोटो शेअर करत याला “तुझं कुटुंबात स्वागत आहे रितू” असं कॅप्शन दिलं आहे. अमृतासह तिची आई सुद्धा सार्थकच्या साखरपुड्याला उपस्थित होती. याशिवाय समीर चौघुले, स्वप्नील जोशी हे कलाकार सुद्धा सार्थकला भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
दरम्यान, सार्थक ओकने जर्मनीत त्याचं उच्च शिक्षण पूर्ण केलं आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्या पदवी प्रदान समारंभासाठी संपूर्ण कुटुंब जर्मनीला गेलं होतं. यावेळी सार्थकसाठी पोस्ट शेअर करत प्रसाद ओकने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये “आम्हा सगळ्यांपासून खूप लांब राहून शिक्षण घ्यायचा निर्णय तू अत्यंत धाडसानी घेतलास… खूप कष्ट केलेस… खूप अभ्यास केलास…आज हे क्षण पाहताना तुझ्या निर्णयाचं आणि कष्टांचं चीज झालं असं मनापासून वाटतंय.” असं म्हटलं होतं. अलीकडेच सार्थकने त्याच्या लाडक्या बाबाला आलिशान गाडी गिफ्ट दिल्याचं देखील पाहायला मिळालं होतं.

आता थाटामाटात साखरपुडा पार पडल्यावर प्रसाद व मंजिरी ओक यांचा मुलगा सार्थक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
