Prashant Damle On Ashok Saraf : मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. काही कलाकार हे रातोरात स्टार होतात; तर काही कलाकार हे वर्षानुवर्षे मेहनत घेत असतात. मराठी कलाविश्वामध्ये अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. सिनेमा व नाटक अशा विविध माध्यमांतून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली असून, त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे ते या क्षेत्रामध्ये अनेक वर्षानुवर्षे काम करीत आहेत. त्यांपैकी एक कलाकार म्हणजे प्रशांत दामले.
नाटक, सिनेमा आणि कविता यांमधून प्रेक्षकांच्या मनोराज्य करणारे प्रशांत दामले यांचा चाहतावर्ग मोठा आहे. चार दशकांहून अधिक काळ आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी रंगभूमीवर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांचा विनोद आणि त्या विनोदाचे टायमिंग यांमुळे प्रशांत दामले हे ओळखले जातात. सिनेविश्वातील या दीर्घ प्रवासामध्ये त्यांना अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम करता आले. अनेकांनी त्यांना शिकवण दिली, तर काहींनी त्यांना अनुभवातून धडे दिले. प्रशांत दामले यांनी सिनेविश्वातील या प्रवासामध्ये त्यांना अशोक सराफ यांनी काय शिकवले याबद्दल सांगितले आहे. अशोक सराफ यांनी सांगून नाही, तर अनुभवातून शिकवल्याचे प्रशांत दामले यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले प्रशांत दामले?
‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रशांत दामले यांनी त्यांचे सिनेविश्वातील अनुभव व आठवणी सांगितल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी या प्रवासामध्ये सुरुवातीला अनेकांकडून खूप गोष्टी शिकल्याचे नमूद केले. प्रशांत दामले म्हणाले, “कोणीही सर्वगुणसंपन्न किंवा १०० टक्के बरोबर असा नसतो. पण जर मला तुझ्याकडून काही गोष्टी शिकायच्या असतील, तर तुझी चांगली गोष्ट काय आहे, याकडे मी लक्ष दिले पाहिजे. सुदैवाने माझ्या आजूबाजूला सगळी तशीच चांगली मंडळी होती.”
पुढे ते म्हणाले, “माझ्या आजूबाजूला शिकवणारी किंबहुना न शिकवणारी लोक होते. अशोक सराफ यांनी मला आयुष्यात कधी काही शिकवले नाही. १८ व्या चित्रपटाच्या वेळी त्यांनी मला सांगितलं की, हा चित्रपट तू चांगला केला आहेस. प्रत्येक चित्रपटाच्या शूटिंगवेळी शॉट झाल्यानंतर ते मला काम कसं करायचं हे सांगायचे. ‘प्रशांत, तू असं केलंस, त्यापेक्षा असं केलं असतं, तर मस्त झालं असतं. पुढच्या वेळी लक्षात ठेव,’ असे अशोक सराफ सांगायचे.”
प्रशांत दामले म्हणाले, “यावर मी अशोक सराफ यांना म्हणायचो की, ‘दर वेळी ते तुम्ही मला शॉट झाल्यानंतर का सांगात आहात? जरा आधी सांगा ना हे असं करं किंवा करू नको.’ यावर अशोक सराफ म्हणायचे, ‘मी असं कसं सांगणार, तू माझा सहकलाकार आहेस. तुला शिकायचं आहे आणि मी असंच सांगत राहिलो, तर काय उपयोग आहे,’ असं अशोक सराफ म्हणायचे. माझे १८ चित्रपट झाल्यानंतर ‘सवत माझी लाडकी’ सिनेमावेळी त्यांनी माझं कौतुक केलं. प्रीव्ह्यू झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की, ‘या चित्रपटातील अभिनयामुळे तुला बक्षीस मिळण्याची संधी आहे. आणि त्या चित्रपटाला मला खरंच बक्षीस मिळालं; पण त्यासाठी मला १८ चित्रपट खर्ची घालावे लागले.”
पुढे ते म्हणाले, “बक्षीस मिळाल्यानंतर अशोक सराफ म्हणाले, ‘आता तुला सांगावं लागणार नाही; कारण – आता तुझ्या हे लक्षात आले आहे. कानात सांगून नाही, तर डोक्यानं शिकता आलं पाहिजे, तर ते चांगलं असतं, अशी शिकवण अशोक सराफ यांनी दिली. अशी माणसं व सहकलाकार भेटले आणि त्यामुळे मी खूप आनंदी आहे.”
