‘धुरंधर’ चित्रपटाच्या दोन्ही भागांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं आहे. या चित्रपटाचा पहिला भाग गेल्यावर्षी ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, आणि यामधील FA9LA गाणं सोशल मीडियावर सुपरहिट ठरलं होतं. या गाण्यातील अक्षय खन्नाचा डान्स, त्याची हूकस्टेप याचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं. सर्वत्र FA9LA गाण्याची क्रेझ निर्माण झाली अन् मनोरंजन विश्वातील कलाकारांपासून ते सामान्य लोकांपर्यंत अनेकजण या गाण्यावर थिरकले.

नुकताच अक्षय खन्नाच्या या FA9LA गाण्यावर लोकप्रिय मराठी कलाकारांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘शिकायला गेलो एक’ या नाटकाची संपूर्ण टीम परदेश दौऱ्यावर आहे. कॅनडामध्ये या नाटकाचे हाऊसफुल प्रयोग सुरू आहेत. प्रशांत दामलेंची मुख्य भूमिका असलेल्या या नाटकाला परदेशातही भरभरून प्रेम मिळतंय. याच नाटकातील सगळ्या पुरुष कलाकारांनी FA9LA गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

‘शिकायला गेलो एक’ या नाटकातील मराठी कलाकार नुकतेच कॅनडातील ‘एबॉट्सफोर्ड ट्यूलिप महोत्सव’ पाहण्यासाठी गेले होते. याठिकाणी पर्यटकांना विविध रंगीबेरंगी फुलं पाहायला मिळतात. याच फुलांच्या मळ्यात मराठी कलाकारांनी FA9LA गाण्यावर ठेका धरला होता.

प्रशांत दामले, सुशील इनामदार, हृषिकेश शेलार आणि या नाटकाच्या टीमची अन्य मंडळी यावेळी FA9LA गाण्यावर थिरकली. यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सुशील इनामदारने या व्हिडीओला ‘धुरंधर Boys’ असं कॅप्शन दिलं आहे. या सगळ्यांनी डान्स करताना अक्षय खन्नाप्रमाणे हुबेहूब हूकस्टेप केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

नम्रता संभेराव, भक्ती देसाई, स्वप्नील राजशेखर, अनघा अतुल या सगळ्या कलाकारांसह नेटकऱ्यांनी सुद्धा या कलाकारांच्या भन्नाट एनर्जीचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, शिकायला गेलो एक या नाटकाबद्दल सांगायचं झालं, तर याचं लेखन-दिग्दर्शन अद्वैत दादरकरने केलं आहे. त्याचप्रमाणे या नाटकात प्रशांत दामलेंसह अनघा अतुल, सुशील इनामदार, हृषिकेश शेलार, समृद्धी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.