Pravin Tarde On Bhor Case: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६५ वर्षीय नराधमाला अटक केली असली, तरी संपूर्ण पुण्यातून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर एक अत्यंत आक्रमक पोस्ट शेअर केली आहे. तरडेंनी या प्रकरणावर आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला असून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
प्रवीण तरडे यांनी फेसबूकवर पोस्ट करून या अत्याचार प्रकरणाचा निषेध केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी एन्काऊंटर करण्याची मागणी केली आहे. त्याचा एन्काउंटर झाला नाही, तर भोरच्या लोकांनी कायदा हातात घ्यावा, असं त्यांनी थेट म्हटलंय.
प्रवीण तरडेंची पोस्ट
“उद्या त्या नराधमाचे एन्काऊंटर झालं, तरच मानू की हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आहे.. अन्यथा भोरच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा,” अशी पोस्ट प्रवीण तरडेंनी केली आहे.

लोकही संतापले
दरम्यान, त्यांच्या या पोस्टवर लोकदेखील प्रतिक्रिया देत आहेत. सरकार गेलं उडत… आपण सामान्य जनतेनेच न्याय निवाडा करायला पाहिजे, कायद्याचा वचक हा असायलाच पाहिजे! अशा नराधमांसाठी हीच शिक्षा योग्य राहील, सीसीटीव्हीमध्ये जर स्पष्ट दिसतंय, तर त्याला लोकांसमोर आणून चौरंगा केला पाहिजे ही शिक्षा महाराष्ट्रात सुरू करायला हवी. दोन हात, दोन पाय आणि दोन डोळे काढून चौकात बसवा, परत कोणता मायचा लाल हिंमत करणार नाही गुन्हा करायला, अशा कमेंट्स या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
नेमकी घटना काय?
भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या मुलीवर एका गोठ्यात अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने त्या चिमुकलीला दगडाने ठेचून मारले. आरोपीने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पूरल्याचे उघडकीस आल्यानंतर लोक संतापले. या भागातील नागरिकांनी पुणे- सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर ग्रामस्थांनी राजगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीला ताब्यात देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
