Deool Band 2 Movie Collection Day 11 Updates : ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट २१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या सिनेमाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील अनेक ठिकाणी पहाटे साडेपाच वाजताचा शो सुद्धा हाऊसफुल्ल होता. याशिवाय ‘देऊळ बंद २’ने पहिल्या तीन दिवसांतच आपलं मूळ बजेट वसूल करत ११.३७ कोटींचा गल्ला जमावला. यावरून हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवणार हे जवळपास स्पष्ट झालं होतं. आता नुकतीच ‘देऊळ बंद २’च्या कलेक्शन संदर्भातील एक आनंदाची बातमी दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
‘देऊळ बंद २’ चित्रपटाने अवघ्या ११ दिवसांत तब्बल ५०.१५ कोटींची कमाई केली आहे. खरंतर, मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘देऊळ बंद २’ सिनेमाचं मूळ बजेट जवळपास ८ ते १० कोटी आहे. त्यामुळे सिनेमाच्या कलेक्शनची आकडेवारी पाहता, मूळ बजेटपेक्षा पाचपट कमाई करून आता ‘देऊळ बंद २’ सिनेमावर ब्लॉकबस्टरची पाटी लागली आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी संपूर्ण मराठी कलाविश्वातून प्रवीण तरडेंवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
‘देऊळ बंद २’ चित्रपटाच्या कमाईत दहाव्या आणि अकराव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शनिवार-रविवारी मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आयपीएलचा अंतिम सामना असूनही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या चित्रपटाचे मध्यरात्रीचे शोज सुद्धा हाऊसफुल्ल होते.
‘देऊळ बंद २’ सिनेमाचं एकूण कलेक्शन
पहिल्या आठ दिवसांचं एकूण कलेक्शन – ३२.८२ कोटी
एकूण ११ दिवसांचं कलेक्शन – ५०.१५ कोटी
प्रवीण तरडेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या ११ दिवसांच्या कलेक्शनची माहिती चाहत्यांना दिली आहे. “…आणि इतिहास घडला मित्रांनो” असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी प्रवीण तरडेंच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, ‘देऊळ बंद २’ चित्रपटात स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासह या सिनेमात ओम भूतकर, प्रसाद ओक, रमेश परदेशी, महेश मांजरेकर, संस्कृती बालगुडे या कलाकारांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मोहन जोशींनी ७५ व्या वर्षी या सिनेमात श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. एका सीनसाठी त्यांनी सलग ३३ तास शूट केलं होतं. यावरून ‘देऊळ बंद २’च्या टीमने या संपूर्ण सिनेमासाठी किती मेहनत घेतलीये हे स्पष्ट होतं.
