Riteish Deshmukh & Pravin Tarde : २०२६ हे वर्ष मराठी सिनेमासाठी खूपच खास ठरलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला हेमंत ढोमेच्या ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली सुरुवात केली. यानंतर रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केल्याचं पाहायला मिळालं. मराठीत १३० कोटींची कमाई करणारा हा पहिला सिनेमा ठरला आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काही दिवसांतच प्रवीण तरडेंचा ‘देऊळ बंद २’ सिनेमा प्रदर्शित झाला. अवघ्या ८ ते १० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर तब्बल ९३ कोटींहून अधिक कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेईल.
सध्या सर्वत्र ‘देऊळ बंद २’ चित्रपट ‘सैराट’, ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडेल का? याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र, या सर्व चर्चांवर प्रवीण तरडेंनी आपलं प्रांजळ मत व्यक्त करत, राजा शिवाजीचा रेकॉर्ड देऊळबंदने मोडू नये आणि काहीही झालं तरी आपला मराठी सिनेमा मोठा झाला हवा असं सांगितलं आहे.
प्रवीण तरडे ‘प्लॅनेट मराठी’च्या मुलाखतीत म्हणाले, “माझा सिनेमा कितीही मोठा झाला तरी, त्याने ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू नये असं मला वाटतं. कारण, तो सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित आहे. रितेश खूप चांगला माणूस आहे. रितेश सर-जिनिलीया मॅम आपल्यासाठी आदर्श जोडी आहेत. त्या दोघांबद्दल एक खास गोष्ट सांगतो.”
प्रवीण तरडे पुढे म्हणाले, “राजा शिवाजी’ सिनेमा हाऊसफुल्ल सुरू होता आणि काही दिवसांनी आमचा ‘देऊळ बंद २’ चित्रपट प्रदर्शित झाला. ‘देऊळ बंद २’ सुद्धा हाऊसफुल्ल झाला आणि ११ दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई आमच्या सिनेमाने केली. त्यावेळी सगळ्यात आधी मला रितेश देशमुख यांचा फोन आला होता.”
“रितेश सर मला फोनवर म्हणाले, “अभिनंदन प्रवीण…मला खूप बरं वाटतंय कारण, आज एक मराठी सिनेमा दुसऱ्या सिनेमाला टक्कर देत पुढे जातोय. तू माझ्यापुढे जा…दोन आठवड्याने तुझ्यापुढे अजून कोणीतरी जाऊदेत. आपल्या मराठी सिनेमाला भरपूर यश मिळूदेत. ही किती सुंदर भावना आहे. त्यामुळे सिनेमा कोणाचाही असो रितेश देशमुख, प्रवीण तरडे किंवा नागराज मंजुळे उद्देश एकच…आपला मराठी सिनेमा मोठा झाला पाहिजे.” असं मत प्रवीण तरडेंनी व्यक्त केलं.
