Pravin Tarde : ‘देऊळबंद २’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमाचा गेल्या महिन्याभराचा बॉक्स ऑफिसवरील प्रवास पाहता लवकरच ‘देऊळबंद २’ १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या चित्रपटाला भरभरून यश मिळाल्यावर सर्वत्र प्रवीण तरडे आणि टीमचं कौतुक करण्यात येत आहे. पण, सिनेमा रिलीज होण्यापूर्वी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. ‘देऊळबंद २’साठी तरडेंकडे पैसे नव्हते…या कठीण परिस्थितीत शाहरुख खानसह त्याच्या रेड चिलीज कंपनीने साथ दिल्याचं, प्रवीण तरडेंनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.
प्रवीण तरडे अभिजात मराठी फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “देऊळबंद २’ सिनेमाचा DCP (Digital Cinema Package एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी वापरला जाणारा डिजिटल फॉरमॅट) काढायचा होता. पण आमच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा शाहरुख खान साहेबांसह त्यांच्या रेड चिलीज कंपनीने खूप मोठी मदत केली. आमचं बजेट होतं १२ लाखांचं पण, ते सगळं बिल एकूण ४२ लाखांचं झालं. आता एवढे पैसे कुठून आणणार? त्यानंतर मग आम्ही ‘रेड चिलीज’ला विनंती केली होती की, मराठी सिनेमा आहे इतकं बजेट नाहीये. आम्हाला हा सिनेमा खूप भारी दाखवायचा होता…म्हणून आम्ही तुमची मदत घेतली.”
प्रवीण तरडे पुढे म्हणाले, “शेवटी ही बातमी शाहरुख खान सरांपर्यंत पोहोचली. त्यांनी मग रेड चिलीजची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्यांना नेमकं काय झालंय वगैरे विचारलं. शाहरुख साहेबांच्या टीमने त्यांना सांगितलं, सर ‘मुळशी पॅटर्न’वाल्याचा चित्रपट आहे. आता भाईजानने आधीच ‘अंतिम’ सिनेमा रिमेक केल्यामुळे शाहरुखला ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट माहीत होता. मग त्यांनी टीमला विचारलं, हा नवीन चित्रपट कसा बनवलाय? त्यांच्या टीमने सांगितलं, खूप छान सिनेमा तयार केलाय, भावनिक सिनेमा आहे आणि आता DCP द्यायचीये. पण, त्यांच्याकडे पैसे नाहीयेत. पूर्ण पैसे दिल्याशिवाय DCP देत नाहीत हा नियम आहे.”
“शाहरुख खानने कसलाही विचार न करता सांगितलं तुम्ही त्यांना DCP देऊन टाका. ‘उनका बिल माफ करो…’ चित्रपट चांगलाय, मग DCP देऊन टाका. रेड चिलीजने ४० ते ४५ टक्के बिल माफ केलं. मराठी सिनेमासाठी त्यांनी जे पाऊल उचललं, इतकी मोठी मदत केली…त्यामुळे शाहरुख खान आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मला खूप कौतुक आहे. पैसे सोडा…चित्रपट महत्त्वाचा हा त्यांचा विचार होता…हे आजच्या जगात किती महत्त्वाचं आहे.”
“आता शाहरुखला हा सिनेमा दाखवायला मला खूप आवडेल. आता आमच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर खूप यश मिळालं. कदाचित आता चित्रपट १०० कोटींची कमाई सुद्धा करेल…तेव्हा सगळेजण कौतुक करतील. पण, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा शाहरुखने केलेली मदत न विसरता येणारी आहे. सिनेमा हिट होईल किंवा फ्लॉप होईल हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं…तेव्हा त्यांनी मदत केलीये. मी त्यांचा कायम ऋणी असेन.” अशा भावना प्रवीण तरडेंनी व्यक्त केल्या आहेत.
