‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ अशा चित्रपटांची नावं जरी घेतली तरी पहिल्या व्यक्तीचं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे प्रवीण तरडे. मराठीसह हिंदी कलाविश्वात त्यांनी आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटला आहे. रंगभूमीपासून त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली. अभिनेते सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये काम केल्यावर आता लवकरच हे हरहुन्नरी अभिनेते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रवीण तरडे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. अखेर चित्रपटातील आपला पहिला लूक आणि सिनेमाचं नाव जाहीर करत प्रवीण तरडेंनी त्यांच्या ‘खतरनाक’ दाक्षिणात्य एन्ट्रीची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील आपले हे रांगडे हिरो दक्षिणेत मुख्य खलनायकाची भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रवीण तरडे मुख्य खलनायकाच्या भूमिकेत झळकणार हे कळताच आता प्रत्येकाच्या मनात या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे.

हेही वाचा : Video : मैनू विदा करो…; ‘तुझेच मी गीत गात आहे’मधील पिहूने अरिजित सिंहचं गाणं गात प्रेक्षकांचे मानले आभार, जुन्या आठवणींना दिला उजाळा

प्रवीण तरडे मुख्य खलनायकाची भूमिका साकारणार असलेल्या या चित्रपटाचं नाव ‘अहो विक्रमार्का’ असं आहे. याबद्दल ते लिहितात, “दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ‘मुख्य खलनायक’ म्हणून माझा प्रवेश… ‘अहो विक्रमार्का’मध्ये ‘असुरा’ बनून येतोय तुमच्या भेटीला… मराठी बरोबर भारतातल्या सहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अख्ख्या भारतभर मार्केट आता आपलं आहे.”

दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता देव गिल ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे यांच्यासह तेजस्विनी पंडित, सयाजी शिंदे, चित्रा शुक्ला अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी असणार आहे.

हेही वाचा : १२ वर्षांपूर्वी ‘देवयानी’ अन् आता ‘मानसी’, नवीन मालिका सुरू होण्यापूर्वी शिवानी सुर्वेची खास पोस्ट, प्रेक्षकांना म्हणाली…

दरम्यान, प्रवीण तरडेंनी ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटातील आपला पहिला लूक शेअर केल्यावर त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टवर “आरारा खतरनाक”, “जय शिवराय सर”, “हार्दिक अभिनंदन सर”, “आता सर दाक्षिणात्य इंडस्ट्री गाजवा” अशा असंख्य कमेंट्स करत प्रवीण तरडेंना या नव्या चित्रपटासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या पतीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.