प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर वडिलांबरोबरचा व्हिडीओ शेअर करत आई-वडिलांबरोबर वेळ घालवणं किती महत्त्वाचं असतं याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या वडिलांबरोबरचं नातं आणि त्यांना असलेली क्रिकेटची आवड याबद्दलही सांगितलं आहे. त्याचसह व्हिडीओला मोठी कॅप्शन देत त्यांच्या घरी पहिल्यांदा टीव्ही कधी आला होता हेसुद्धा सांगितलं आहे.
इन्स्टाग्रामवर वडिलांबरोबरचा व्हिडीओ शेअर करत प्रवीण तरडे म्हणाले, “आज वेळात वेळ काढून वडिलांबरोबर क्रिकेट मॅच बघतोय. आमचे वडील तसे क्रिकेटचे फार चाहते नाहीयेत पण आनंदी आहेत. क्रिकेट मॅच पाहत आहेत. म्हटलं मित्रांबरोबर नेहमी बघतो पण आज काहीही झालं तरी वडिलांबरोबर क्रिकेट मॅच बघायची आणि आज वडील गावावरुन आलेत इकडे. त्यामुळे आज क्रिकेट.”
प्रवीण तरडे यांनी पुढे वडिलांशी संवाद साधला. वडिलांना ते म्हणाले, “मजा येतेय का? किती बाउंड्री मारल्या?” यावर त्यांचे वडील म्हणाले, “सात-आठ मारल्या.” प्रवीण तरडे पुढे म्हणाले, “श्रेयस अय्यरने चार-पाच बाउंड्री मारल्या लागोपाठ तर ते म्हणाल्या लागले आमच्यावेळी इतक्या पटापटा बाउंड्री मारायचे नाही. मी म्हटलं आता क्रिकेट बदललं आहे.” प्रवीण तरडे पुढे म्हणाले, “माझ्या वडिलांनी १९८३च्या वर्ल्ड कपची मॅच पाहण्यासाठी पहिल्यांदा टीव्ही घेतला. त्यामुळे १९८३चा अंतिम सामना म्हणून आमच्या घरी टीव्ही आला.”
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी याला “आज ठरवून वडीलांबरोबर मॅच बघतोय. वय वर्षे ८४. आपण सगळ्या जगाला वेळ देतो पण ज्याने आपल्याला जग दाखवलं त्याला विसरतो.. खूप मजा आली.. त्यांच्याशी त्यांच्या आवडत्या विषयांवर बोललो.. बाकी काही नाही एक लक्षात आलं बाप आहे तोवर रोज त्यांच्याशी बोललं पाहीजे..म्हणजे त्यांना बोलू द्यायचं आपण फक्तं ऐकायचं.” अशी कॅप्शन दिली आहे.
