Pravin Tarde on Casting Friends Movies: मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे हे त्यांच्या मित्रांबद्दल नेहमीच भरभरून बोलतात. त्यांच्या आयुष्यात मित्रांचं स्थान किती खास आहे, याची झलक त्यांच्या मुलाखती आणि चित्रपटांमधूनही पाहायला मिळते. त्यांच्या सिनेमांमध्येही अनेकदा त्यांचे जवळचे मित्र महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतात. आता पुन्हा एकदा प्रवीण तरडेंनी आपल्या आयुष्यातील मैत्रीचं महत्त्व सांगत, मित्रांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नुकत्याच ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रवीण तरडेंनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं. कुटुंब, सिनेमा आणि मित्र याबद्दल गप्पा मारल्या. त्यामध्ये प्रवीण तरडेंनी त्यांचं फार्म हाऊस आणि शेती यांची झलक दाखवली. यावेळी प्रवीण तरडेंच्या आयुष्यामध्ये त्यांचे मित्र खूप महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. “आयुष्यामध्ये आई-वडील आणि भाऊ-बहीण ही नाती निवडून घेता येत नाही; पण मैत्री हे एकमेव नातं आहे, जे आपल्याला आवडीप्रमाणे मिळवता येतं,” असं मत व्यक्त केलं आहे.

आपण आई-वडिलांना निवडू शकतो का? – प्रवीण तरडे

प्रवीण तरडे यांना, ‘सिनेमामध्ये मित्रांनाच खूप महत्त्व देता, त्यामुळे तुमच्यासाठी मैत्री काय आहे’, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “आपण मित्रांना महत्त्व दिलंच पाहिजे. आपण आई-वडिलांना निवडू शकतो का? तर नाही… आपण आई-वडिलांची निवड करू शकत नाही. भाऊ-बहीण ही नातीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असतात; आपण ती निवडत नाही. उंच असा गोरापान भाऊ मला पाहिजे, असं आपण म्हणू शकत नाही. भाऊ-बहीण हे आपण मागून घेतो का? तर नाही. ते आपल्याला जन्मापासून भेटतात.”

पुढे ते म्हणाले, “आपल्या आयुष्यात नातेवाईक असतात; ते आपण मागितले म्हणून मिळत नाहीत. पण, एकमेव असं नातं आहे, जे आपल्याला निवडता येतं आणि ते म्हणजे मित्र. त्यामुळे मैत्रीमध्ये आपण आपल्याला आवडतील, असे लोक घेऊ शकतो. त्यामुळे सिनेमा हा मित्रांचाच असला पाहिजे. माझा असा एकही चित्रपट नाहीये, ज्यामध्ये माझे मित्र नाहीयेत. माझे मित्र असे नाहीत, की काही नाही तर माझ्या सिनेमात काम कर. माझे मित्र माझ्याबरोबर ३० वर्षांपासून नाटकांमध्ये काम करतायेत.”

प्रवीण तरडेंच्या सिनेमांमध्ये मित्रांनाच संधी का?

पुढे प्रवीण तरडे म्हणाले, “माझ्या नाटकामध्ये माझ्या मित्रांनी बॅक स्टेजलाही कामं केली आहेत. त्यांनी सामान उचलण्याचं आणि लाइट लावण्याचं काम केलंय. तेव्हापासून ते माझ्याबरोबर आहेत. एकत्र इथंपर्यंत आलोय आणि त्यामुळे आता सिनेमासुद्धा एकत्रच करणार. मित्रांना घेण्याचा एक फायदाही असतो. मोठ्या स्टारला सिनेमामध्ये घेतलं, तर प्रमोशनच्या वेळी त्यांच्या तारखा मिळत नाहीत. त्या हीरोचे नखरे ऐकून घ्यावे लागतात; पण मित्रांना सिनेमात घेतलं, तर असं होत नाही. मित्रांना हक्कानं सांगता येतं. पिट्याला सांगतो की, तू लातूरला जा, दयाला सांगतो की, तू नागपूरला जा, केदार, सुमन तू माझ्याबरोबर मुंबईला चल… ते खूप सहज येतात.”

मुळशी पॅटर्न २ वर काम सुरू

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद २’ने बॉक्स ऑफिस गाजवले होते. या सिनेमाने १०० कोटींचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्याचबरोबर प्रवीण तरडे हे सध्या ‘मुळशी पॅटर्न २’वर काम करीत आहेत.