Pravin Tarde Marathi Box Office : यंदाच्या वर्षी मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, जोरदार कमाई करीत आहेत. २०२६ या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांतच तब्बल दोन मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची तुफान कमाई करीत इतिहास रचला आहे. मराठी प्रेक्षक सिनेमागृहांत जात नाहीत, अशी तक्रार करणाऱ्यांना या कमाईने चोख उत्तर दिले आहे. अनेकदा मराठी प्रेक्षक हे चित्रपट पाहत नसून, योग्य प्रतिसाद दिला जात नसल्याची खंत व्यक्त केली जाते. त्यावर लोकप्रिय दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. या देशातला सगळ्यात बुद्धिमान कोणी असेल, तर तो आपला मराठी प्रेक्षक आहे, असे म्हणत प्रवीण तरडे यांनी मराठी चित्रपटांबाबत मत मांडले आहे.
‘द पोस्टमन’ या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मराठी चित्रपट आणि प्रेक्षक यावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठी सिनेमे प्रेक्षक बघत नाहीयेत म्हणून हिट होत नाहीये, असा आरोप केला जातो, त्याबद्दल काय मत आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर प्रवीण तरडे म्हणाले, “या देशातला सगळ्यात बुद्धिमान प्रेक्षक कोणी असेल, तर तो आपला मराठी प्रेक्षक आहे. तुम्ही काहीही आणाल आणि बघा बघा कराल. तुम्ही रडून जरी त्यांच्या पाया पडलात तरी ते बघणार नाहीत. याचे कारण म्हणजे मराठी माणसाचा पैसा हा कष्टाचा आणि घामाचा असतो. त्याला माहीत आहे, तो कुठे घालवायचा आहे.”
मराठी प्रेक्षक खूप प्रॅक्टिकल
पुढे ते म्हणाले, “तुम्ही प्रेक्षकांसमोर कितीही रडगाणं गा किंवा दया मागा, ते त्यांचा मौल्यवान वेळ आणि पैसा फुकट घालवणार नाहीत. कष्टाचा पैसा तो कुठेही का घालवेल? तुमची दया माया येऊन प्रेक्षक चित्रपट बघायला जाणार नाहीत. एक तर प्रेक्षक खूप प्रॅक्टिकल आहेत. त्यामुळे त्यांना जे पाहायचं आहे, तेच ते पाहणार आहेत. ते उगाच कुठलंही थोतांड आलं म्हणून पाहणार नाहीत, त्याला डोक्यावर घेणार नाहीत. त्यांना पाहायचा आहे ते पाहणारच. योग्य सिनेमे ते पाहणार आहेत. त्यामुळे उगीच त्यांच्यासमोर रडगाणं करण्यात काहीही अर्थ नाही. त्यांना काहीही फरक पडत नाही. कारण- ते हुशार आहेत.”
आपली कलाकृती बोलली पाहिजे – तरडे
प्रवीण तरडे म्हणाले, “प्रेक्षकांना हे कळतं की, हे समोर येऊन रडतंय म्हणजे हे येडंय. हे रडून सांगतं आहे म्हणजे हे काय कामाचं आहे? हे प्रेक्षकांना कळतं. आपण रडायचं नसतं. मेकर्सनी स्वतः रडण्यापेक्षा अशा कलाकृती बनवल्या पाहिजेत, ज्या पाहून प्रेक्षक आनंदानं हसतील किंवा भावूक होतील. प्रेक्षक चित्रपट पाहून दु:खानं रडले पाहिजेत, आनंदानं हसले पाहिजेत आणि भावनिक झाले पाहिजेत. हे सगळं आपली कलाकृती बोलली पाहिजे. आपण कशाला जास्त सांगायचं? आपण १०० कोटी झाल्यानंतर बोलायचं आणि मजा करायची.”
‘देऊळ बंद २’ व ‘राजा शिवाजी’ चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा ‘देऊळ बंद २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. हा सिनेमा २१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामध्ये स्नेहल तरडे, अतुल कुदळे, पिट्याभाई रमेश परदेशी, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, महेश मांजरेकर, ओम भूतकर, मंगेश देसाई, प्रसाद ओक, सविता मालपेकर, देवेंद्र गायकवाड, सुनील अभ्यंकर, जगन्नाथ निवंगुणे व संस्कृती बालगुडे हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांत झळकले आहेत. स्वामी समर्थ व शेतकऱ्यांची व्यथा यांवर आधारित ‘देऊळ बंद २’ चित्रपटाची घोडदौड अजूनही सुरू आहे. त्याशिवाय २०२६ मध्ये अशी कामगिरी करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. यापूर्वी रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाने १०० कोटींचा टप्पा पार केला होता.
