Pravin Tarde Interview: मराठी सिनेविश्वाला पुन्हा एकदा नव्याने उभारी मिळू लागली आहे. प्रेक्षकांचा चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळाला असून, सहा महिन्यांमध्ये दोन मराठी चित्रपटांनी १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद २’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. मराठी चित्रपटांना घवघवीत यश मिळाल्यानंतर प्रवीण तरडे यांनी मराठी प्रेक्षकांबाबत मत व्यक्त केले आहे. तसेच आपल्याकडे चेहऱ्याला नाही, तर विषयाला किंमत आहे, असे नमूद केले.
प्रवीण तरडे यांनी ‘द पोस्टमन’ या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मराठी सिनेमा आणि प्रेक्षक यांबाबत मत व्यक्त केले आहे. मराठी प्रेक्षक चांगला विषय असलेल्या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देतात आणि उचलून धरतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी नवीन चेहरे असून चित्रपट हिट कसा करता येतो, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रवीण तरडे म्हणाले, “मराठी सिनेमामध्ये कथेलाच महत्त्व आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिग्दर्शक हाच खरा हीरो आहे. नागराज मंजुळेंचा सिनेमा, महेश मांजरेकर यांचा सिनेमा आणि प्रवीण तरडेचा पिक्चर, असं बोललं जातं. कारण- जर चित्रपटाचा विषय हा दिग्दर्शकानं योग्य पद्धतीनं हाताळला, तर तो सिनेमा सुपरहिट होतोच.”
मराठी नटांच्या बाबतीत हिरोइझम नाही – प्रवीण
पुढे ते म्हणाले, “मराठी सिनेविश्वातील अशा एखाद्या हीरोचं नाव सांगा, ज्याला घेतलं की, १०० टक्के चित्रपट ५० कोटींची कमाई करतोच. आपल्या मराठी सिनेविश्वामध्ये हिरोइझम नाहीये. नटांच्या बाबतीत हिरोइझम नाहीये. आपल्याकडे कथेलाच प्राधान्य दिलं जातं. पुण्यातला प्रेक्षक हा कुठल्या तरी हीरोचा चेहरा बघून चित्रपट बघायला जात नाहीत आणि कधीच जाणार नाहीत. त्यामुळे त्यांना कथा आवडली, तरच ते जातात. प्रेक्षक खूप बुद्धिमान आहेत; ते काहीही पाहायला जाणार नाहीत. कुठल्या तरी चेहऱ्याची भुरळ पडून ते जाणार नाहीत. पण चांगली कथा असेल, तर हेच लोक १०० कोटींवर चित्रपट नेतात. आपल्याकडे चेहऱ्याला किंमतच नाहीये; आपल्याकडे विषयाला किंमत आहे.”
मराठी प्रेक्षकांबाबत प्रवीण तरडे म्हणाले, “या देशातला सगळ्यात बुद्धिमान प्रेक्षक कोणी असेल, तर तो आपला मराठी प्रेक्षक आहे. तुम्ही काहीही आणाल आणि बघा बघा कराल. तुम्ही रडून त्यांच्या पाया जरी पडलात तरी ते बघणार नाहीत. याचे कारण म्हणजे मराठी माणसाचा पैसा हा कष्टाचा आणि घामाचा असतो. त्याला माहीत आहे, तो कुठे खर्च करायचा. तुमची दया-माया येऊन प्रेक्षक चित्रपट बघायला जाणार नाहीत. एक तर प्रेक्षक खूप प्रॅक्टिकल आहेत. त्यामुळे त्यांना जे पाहायचं आहे, तेच ते पाहणार आहेत.”
