मराठी इंडस्ट्रीमधील सगळेच कलाकार एकोप्याने राहतात, कायम एकमेकांना मदत करतात आणि या सगळ्यांमध्ये एक सुंदर जिव्हाळ्याचं नातं आहे. हा एकोपा सहसा प्रेक्षकांना बॉलीवूडमध्ये पाहायला मिळत नाही. याबद्दलचा एक किस्सा प्रवीण तरडेंनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला.

काही वर्षांपूर्वी एका मराठी पुरस्कार सोहळ्यासाठी प्रवीण तरडे ऑस्ट्रेलियात गेले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर अन्य मराठी कलाकारही होते. पण, यादरम्यान नेमकी त्यांची बॅग हरवली. या बॅगेत त्यांचे कपडे, महत्त्वाचं सामान अन् पैसे देखील होते. अशा कठीण प्रसंगी सहकलाकारांनी स्वत:हून मदत केली असं प्रवीण तरडेंनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

प्रवीण तरडे म्हणाले, “मिफ्ता पुरस्कार सोहळ्यासाठी मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो आणि तेव्हा एअरपोर्टवर नेमकी माझी बॅगच हरवली. बरं त्यावेळी खिशातून पैसे इथे-तिथे पडतील म्हणून मी माझ्या त्या बॅगेत ठेवले होते. आता बॅग हरवल्यामुळे माझ्याकडे पैसेही नव्हते, जेवढे पैसे पाकिटात उरले असतील तेवढेच माझ्याकडे होते. त्यावेळी परदेशात जायची सवय नव्हती. महेश मांजरेकर सरांमुळे मी बाहेरगावी जाऊ शकलो आणि त्यांच्यामुळेच निम्म्या मराठी कलाकारांना परदेशात जायची संधी मिळाली. याशिवाय मी अमेरिका मोहन जोशी सरांमुळे पाहिली कारण, त्यांच्याबरोबर मी नाट्य संमेलनाला गेलो होतो.”

अभिनेते पुढे म्हणाले, “त्यावेळी माझी आणि सई ताम्हणकरची काहीच ओळख नव्हती. पण, माझी बॅग हरवलीये हे जेव्हा तिला समजलं तेव्हा ती लगेच माझ्याजवळ आली आणि तिने विचारपूस केली. ती म्हणाली, ‘तुला काही मदत लागली तर सांग… माझीही बॅग अशीच एकदा हरवली होती.’ त्यानंतर स्वप्नील जोशी आला तो म्हणाला, ‘तुझी बॅग हरवलीये ना? एक काम कर हे थोडे पैसे ठेवून घे….ही काही ऑस्ट्रेलियन करन्सी आहे तुझ्याजवळ ठेवून दे’ स्वप्नीलनंतर किरण यज्ञोपवित आला, त्याने मला त्याचे तीन नवेकोरे शर्ट्स दिले. या सगळ्यांनी स्वत:हून मदत केली, माझी विचारपूस करायला हे सगळे स्वत:हून आले. ही आपली खरी मराठी इंडस्ट्री आहे.”

“आपल्या इंडस्ट्रीत जे कुटुंबासारखं वातावरण आहे ते तसंच राहुदेत. प्रोफेशनलपणा वगैरे नकोच…कारण, यामुळे बॉलीवूड आज संपत चाललंय. साऊथ इंडस्ट्री याच आपलेपणामुळे आता पुढे चाललीये. कारण, तिथेही असंच कौटुंबिक वातावरण आहे. आपली मराठी इंडस्ट्रीही मोठी होती, मोठी आहे आणि ती मोठीच होणार यात काहीच शंका नाही.”

“आपल्याकडे सगळे एकमेकांच्या साथीने पुढे जात आहेत. नागराजचा सिनेमा आला की, मी स्वत:हून पोस्ट करतो…माझा सिनेमा आला की, तो पोस्ट शेअर करतो. अंकुश चौधरी, महेश लिमये, तेजस्विनी पंडित, अमृता खानविलकर, सई हे सगळेजण ट्रेलर-टीझर आला की स्वत:हून फोन करतात. पोस्ट शेअर करतात…ही सगळी आपली माणसं आहेत आणि हीच खरी आपली इंडस्ट्री आहे.” अशा भावना प्रवीण तरडेंनी व्यक्त केल्या.