Pravin Tarde on how he maintain relationship: प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ या सिनेमाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या सिनेमात मोहन जोशी, स्नेहल तरडे, प्रसाद ओक, मंगेश देसाई, अतुल कुडाळ असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करत आहे. प्रेक्षक या सिनेमाला उत्तम प्रतिसाद देत आहेत.
सिनेमाची चर्चा होत असतानाच सध्या प्रवीण तरडे यांच्या वक्तव्यांचीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. प्रवीण तरडे यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर वक्तव्य केले. विविध चित्रपटांच्या शूटिंगदरम्याच्या आठवणी सांगितल्या. तसेच, त्यांच्या नातेसंबंधांबद्दल वक्तव्य केले.
“… तर तुमच्या मोठे होण्याला, पुढे जाण्याला काही अर्थ नाही”
जेव्हा यश मिळाले, प्रसिद्धी मिळाली त्यानंतर आपली माणसं दुरावली की आणखी काही जोडली गेली? यावर प्रवीण तरडे म्हणाले, “माझ्याकडून आजपर्यंत एकही माणूस तुटलेला नाही.लहानपणी जेव्हा कळायला लागलं, तेव्हा झालेले मित्र आजही माझे मित्र आहेत. आजही मी मित्रांसाठी वाढदिवसाची पार्टी ठेवली तर मोठमोठे मंत्रीसुद्धा त्या पार्टीत असतात आणि माझे जगाला माहित नसलेले, पहिलीपासूनचे मित्रही त्या पार्टीत असतात. जितक्या आत्मियतेने मी एखाद्या मोठ्या मंत्र्याला निरोप देतो, तितक्याच आत्मियतेने मी माझ्या त्या मित्रालाही मेसेज करतो.कारण माणूस तुटता कामा नये.ज्या रुममझ्ये कॉट बेसिसवर राहत होतो.तेव्हा संघर्षकाळात कधी कधी डबा नसायचा.तेव्हा समोरच्या कॉटवरच्या मुलाचा अर्धा डबा खायचो. तो सुद्धा प्रेमानं द्यायचा. तो मुलगा आजही माझ्याबरोबर आहे. तो माझ्या कंपनीचा भाग आहे.”
पुढे ते म्हणाले की जर तुम्ही तुमच्या बरोबरीची माणसं पुढे घेऊन गेला नाहीत, तो मोठा झाला नाही तर तुमच्या मोठे होण्याला, पुढे जाण्याला काही अर्थ नाही. माझ्या पहिल्या सिनेमात विनोद वनवे आणि राम खाटमोडे हे दोघेजण असिस्टंट डायरेक्टर होते. दोन सिनेमांनंतर मी त्यांना सांगितलं की आता माझ्याकडे काम करायचं नाही. ते घाबरले, आम्हाला का काढत आहात, असं विचारलं. मी त्यांना म्हणालो की आता तुम्ही स्वत:चा सिनेमा केला पाहिजे आणि तुमचा सिनेमा करून देणं, ही माझी जबाबदारी आहे. म्हणून, विनोद वनवे व राम खाटमोडेचा नवरदेव बीएससी अॅग्रीकल्चर हा सिनेमा आला. माझं म्हणणं असं असतं की आता असिस्टंट म्हणून येऊ नका, स्वत:चा सिनेमा करा.
ते असेही म्हणाले की, जेव्हा माझा असिस्टंट डायरेक्टर स्वत:चा सिनेमा करेल, तेव्हा मी मोठा होईन. आता भास्कर नागमोडे आणि प्रद्यु्म्न देशपांडेचा सिनेमा आला पाहिजे. मग त्यांनी परत माझ्याकडे यायचं नाही, पुढच्यांनी यायचं. हे फक्त बोलून नाही, तर करून दाखवायचं.केल्यानंतर बोलतोय, आधी बोललो नाही. तुमच्या जवळचा माणूस तुम्हाला जपता आला पाहिजे. त्याने न मागता, त्याने न सांगता आपल्याला त्याची अडचण कळली पाहिजे, असे म्हणत प्रवीण तरडेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
