Pravin Tarde Online Raksha Bandhan with Poland Sister :मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी उत्साहामध्ये रक्षाबंधन सण साजरा केला आहे. भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सणाला त्यांच्या नात्यातील प्रेम दिसून येतं. अनेकदा बहीण दुसऱ्या राज्यात किंवा देशात असेल तर मात्र सण साजरा करता येत नाही; पण प्रवीण तरडेंच्या बहिणीने परदेशात राहूनही भावाला राखी बांधण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने प्रवीण तरडे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्या दोन बहिणी त्यांना राखी बांधण्यासाठी प्रत्यक्ष घरी आल्या आहेत, तर त्यांची मोठी बहीण पोलंडमध्ये असल्याने त्यांनी ऑनलाइन पद्धतीनं रक्षाबंधन साजरं केलं. अगदी औक्षणाचे ताट घेऊन आणि ओवाळून प्रवीण तरडे यांच्या बहिणीने ऑनलाइन स्वरूपामध्ये रक्षाबंधन साजरे केले. यावेळी बहिणीने भावासाठी राखीसुद्धा आणल्याचे भावुक क्षण या व्हिडीओमध्ये दिसून आले. अंतर कितीही असलं तरी परंपरा आणि नात्यातील प्रेम कायम ठेवता येतं, हे प्रवीण तरडेंनी दाखवून दिलं.

प्रवीण तरडेंचे ऑनलाइन रक्षाबंधन

यावेळी प्रवीण तरडे म्हणाले, “माझ्या दोन बहिणी इथं राखी बांधायला आल्या आहेत; पण माझी मोठी बहीण परदेशात आहे. ती पोलंडला असून ती तिथून मला ओवाळत आहे. हे आमचं ऑनलाइन रक्षाबंधन सुरू आहे. माझ्या बहिणीचा मुलगा पोलंडला असतो. तो इंजिनियरिंग करून तिकडे राहण्यासाठी गेला, त्यामुळे माझी बहीण मला पोलंडवरून राखी बांधते.”

नेटकऱ्यांनी केलं प्रवीण तरडेंचं कौतुक

सोशल मीडियावर प्रवीण तरडेंनी या अनोख्या रक्षाबंधनाचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत त्यांचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं, “पोलंडमध्ये असूनही आपली संस्कृती जपून ठेवली आहे, हीच खूप मोठी गोष्ट आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, “भारत काय आणि पोलंड काय…जिथं भावना आणि प्रेम असतं तिथं कोणतीही सीमा राहत नाही.” एका नेटकऱ्यानं मजेशीर कमेंट करत, “आरारारा..खतरनाक” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं “आता भावाने ओवाळणीसुद्धा ऑनलाइन पाठवली पाहिजे,” अशा मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. स्नेहल तरडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमानं १०० कोटींचा टप्पा पार केला. यानंतर आता प्रवीण तरडे हे ‘मुळशी पॅटर्न २’ हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.