Pravin Tarde Praises Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. मराठीसह त्यांनी बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांतही काम केलं आहे. आतापर्यंत त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत आणि अनेक हिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग तर मोठा आहेच पण, अनेकदा चाहत्यांसह कलाकार मंडळीसुद्धा त्यांचे चाहते असल्याचं सागंतात. अशातच आता प्रवीण तरडे यांनी महेश यांचं कौतुक केलं आहे.

प्रवीण तरडे सध्या ‘देऊळ बंद २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच आलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत कोट्यवधींची कमाई केली असून प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. या चित्रपटात त्यांनी अभिनयसुद्धा केला आहे. अशातच आता त्यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांचे चित्रपट, सहकलाकार, टीम, कथा आणि सिनेमांना मिळणारं यश याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी मराठी कलाकारांबद्दलही भाष्य केलं आहे. याचबद्दल बोलत असताना त्यांनी महेश मांजरेकर यांचं कौतुक केलं.

प्रवीण तरडेंनी मुलाखतीत मराठी इंडस्ट्रीत स्टारडम नाहीये. त्यांच्याबरोबर काम करणारे कलाकार आणि इंडस्ट्रतील इतर कलाकारसुद्धा नखरे करत नाहीत असं म्हटलं आहे. सेटवर कोणीही व्हॅनिटीत किंवा उन्हात छत्री घेऊयन राहत नाही. असं म्हणाले आहेत. याचवेळी त्यांनी महेश मांजरेकर यांचा किस्सा सांगितला आहे.

महेश सर माझे गुरू – प्रवीण तरडे

प्रवीण तरडे या मुलाखतीत म्हणाले, “महेश मांजरेकर बॉस आहेत आता इंडस्ट्रीत. सातच्या शिफ्टला ते सहा वाजता सेटवर जातात. मोहन जोशी, अंकुश चौधरी ही सगळी मंडळी तशीच. ७५ वर्षांचे मोहन जोशी भर उन्हात सीन करत होते. महेश मांजरेकर नाही जात व्हॅनिटीमध्ये. बॉस आहेत ते. त्यांनी ठरवलं तर ते काहीही करू शकतात. उद्या जर त्यांनी ठरवलं सगळं बंद तर बंद होईल. माझे तर गुरुजी आहेत ते. मला तर सांगताही येत नाही. मी बाकीच्यांशी वागतो तसा त्यांच्याशी वागत नाही. पण ते समजून घेतात. नाही जात व्हॅनिटीमध्ये. म्हणतात सगळे इथे आहेत मग मी का जाऊ”.

दरम्यान, प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’मध्ये महेश मांजरेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. यामध्ये त्यांच्यासह इंडस्ट्रीतील इतरही कलाकार पाहायला मिळत आहेत.”