Pravin Tarde : प्रवीण तरडेंच्या ‘देऊळबंद २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी करत १०० कोटींचा गल्ला जमावला आहे. सध्या संपूर्ण मनोरंजनविश्वातून त्यांचं कौतुक करण्यात येत आहे. याशिवाय प्रवीण तरडेंना दिग्दर्शनासाठी बॉलीवूडमधूनही ऑफर्स येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रवीण तरडेंनी एका मुलाखतीत शाहरुख खानचे आभार मानले होते. ‘देऊळबंद २’साठी तरडेंकडे पैसे नव्हते…या कठीण परिस्थितीत शाहरुख खानसह त्याच्या रेड चिलीज कंपनीने साथ दिल्याचं, प्रवीण तरडेंनी सांगितलं होतं.
प्रवीण तरडेंनी शाहरुख खानचे आभार मानल्यावर सोशल मीडियावर सुद्धा बरीच चर्चा झाली होती. “यावर जो चांगला आहे, तो चांगलाच आहे…एवढ्या मोठ्या मनाने आपल्याला जर कोणी मदत केलीये. तर जात-पात, धर्म पाहून आपण समोरच्याचे आभार मानायचे का?” असा सवाल प्रवीण तरडेंनी पॉडकट्टाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
प्रवीण तरडे म्हणाले, “इथे हिंदू-मुस्लीम म्हणण्याचा प्रश्न काय आहे? तो सिनेमावाला…मी सुद्धा सिनेमा करतोय. मी त्याला जे काही बिल झालं ते कमी करण्याची विनंती केली. त्यानंतर शाहरुखने त्याच्या टीमला इतकंच विचारलं की, चित्रपट चांगला आहे की नाही? सगळेजण म्हणाले अप्रतिम सिनेमा आहे. म्हणून त्याने पैसे कमी केले. DCP (Digital Cinema Package एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी वापरला जाणारा डिजिटल फॉरमॅट) काढायचा होता. पैसे पूर्ण भरल्याशिवाय DCP अजिबात देत नाही. पण, शाहरुख तेव्हा म्हणाला, DCP द्या…बिलाचं नंतर बघू.”
“जर एखाद्या माणसाने एवढ्या मोठ्या मनाने आपल्याला मदत केलीये. तर जात-पात, धर्म पाहून आपण आभार मानायचे का? मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले पाहिजेत. माझी हिंदुत्ववादी विचारसरणी आणि शाहरुख खानचे आभार याचा संबंधच नाहीये. जो चांगला आहे तो चांगला आहे. त्यातही आम्ही एका सिनेमामुळे जोडलो गेलो होतो. आता सलमान खान सुद्धा त्याच्या घरी गणपती आणतोच ना…बरं तो सोशल मीडियावर हे सगळं शेअर सुद्धा करतो.”
“जिथे विचार मांडायचे असतात…तिथे माणसाने कणखर राहिलंच पाहिजे. पण, जिथे विचारांच्या पलीकडे जाऊन उपकार असतात तिथे आभारही मानले पाहिजेत. आता आम्ही गरजू मुलांना मदत करतो…तेव्हा आपण त्यांना विचारसरणीबद्दल विचारत नाही. कारण, मदत करताना फक्त ‘गरजवंत’ आहे एवढंच बघायचं असतं” असं मत प्रवीण तरडेंनी व्यक्त केलं.
शाहरुख खानने नेमकी काय मदत केली?
“आमचं बजेट होतं १२ लाखांचं पण, ते सगळं बिल एकूण ४२ लाखांचं झालं. आता एवढे पैसे कुठून आणणार? त्यानंतर मग आम्ही ‘रेड चिलीज’ला विनंती केली होती की, मराठी सिनेमा आहे इतकं बजेट नाहीये. शेवटी ही बातमी शाहरुख खान सरांपर्यंत पोहोचली. त्यांनी मग रेड चिलीजची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्यांना नेमकं काय झालंय वगैरे विचारलं. शाहरुख साहेबांच्या टीमने त्यांना सांगितलं, सर ‘मुळशी पॅटर्न’वाल्याचा चित्रपट आहे. भाईजानमुळे ते मला ओळखत होते. शाहरुख खानने कसलाही विचार न करता सांगितलं तुम्ही त्यांना DCP देऊन टाका. ‘उनका बिल माफ करो…’ चित्रपट चांगलाय, मग DCP देऊन टाका. रेड चिलीजने ४० ते ४५ टक्के बिल माफ केलं.” असं प्रवीण तरडेंनी सांगितलं.
