Pravin Tarde On Nana Patekar: प्रवीण तरडे हे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ हा सिनेमा प्रचंड गाजला. सिनेमाने १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या सिनेमात मोहन जोशी, स्नेहल तरडे, अतुल कुडाळे, मंगेश देसाई, प्रसाद ओक, संस्कृती बालगुडे, ओम भुतकर, महेश मांजरेकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. प्रवीण तरडे यांनीदेखील या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचे सगळीकडे कौतुक होत आहे.
सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रवीण तरडेंनी अनेक चित्रपटगृहांना स्नेहल तरडे व टीमसह भेट दिली. प्रेक्षकांशी संवाद साधला. प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चित्रपटाच्या यशाबद्दल, चित्रपटाच्या कमाईबद्दल वेळोवेळी सांगितले आहे, तसेच प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत.
आता प्रवीण तरडे त्यांच्या मुलाखतींतील वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांनी ‘तारांगण’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांनी फोन केला होता, याबद्दल सांगितले.
“….त्यामुळे नाना पाटेकर व नीलकांती पाटेकर”
प्रवीण तरडे म्हणाले, “देऊळ बंद २’ यशस्वी झाल्यानंतर मला सगळ्यात पहिला फोन नाना पाटेकरांचा आला होता. त्यांनी फक्त फोन केला नाही, तर त्यांच्या शेतात, गावाला काम करणाऱ्या सगळ्या महिलांना घेऊन २४ की २६ महिला होत्या. त्यांना घेऊन नीलकांती पाटेकर अभिरुची सिटी प्राइडला गेल्या होत्या. स्वत: त्यांची तिकिटे काढली होती. सगळ्या बायकांबरोबर त्यांनी ‘देऊळबंद २’ एकत्रित पाहिला, त्यामुळे नाना पाटेकर व नीलकांती पाटेकर यांचा मी आभारी आहे. सगळ्यात पहिला फोन मला त्यांचा आला होता. तिथून मला खरी उभारी मिळाली”, असे म्हणत नाना पाटेकरांनी फोन केल्याचे प्रवीण तरडे यांनी सांगितले.
प्रवीण तरडे हे दिग्दर्शक, निर्माते म्हणून लोकप्रिय आहेत. तसेच ते विविध भूमिका साकारताना दिसतात. आता आगामी काळात ते कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, नाना पाटेकर यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, ते विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. ते ओ’रोमिओ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तसेच, संकल्प या वेब सीरिजमधून त्यांनी ओटीटीवर पदार्पण केले. आता आगामी काळात ते कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
