Pravin Tarde Deool Band 2 Movie 100 Crore : प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमवत इतिहास रचला आहे. २०२६ हे वर्ष मराठी सिनेमांसाठी खूपच खास ठरलं. प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद २’ या चित्रपटासह ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’, रितेशचा ‘राजा शिवाजी’ सिनेमा, ‘तुंबाडची मंजुळा’, ‘सुपर डुपर’ या सगळ्याच सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं.

सध्या संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वातून प्रवीण तरडेंवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. प्रसाद ओक, मंगेश देसाई यांसह अनेक दिग्गज कलाकारांनी खास पोस्ट शेअर करत प्रवीणसह ‘देऊळ बंद २’च्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडेंना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. “देऊळ बंद २’च्या यशानंतर इंडस्ट्रीतल्या किती लोकांनी फोन केले?” याबद्दल ‘तारांगण’ला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे म्हणाले, “मी स्पष्ट सांगतो…मला सर्वात पहिला फोन आला रितेश देशमुख यांचा! दुसरा फोन आला माझे गुरुजी महेश मांजरेकरांचा…त्यानंतर खूप दिवसांनी मला श्रेयस तळपदेने फोन केला होता. याशिवाय किरण यज्ञोपवीत तसेच मला अंकुश चौधरीने सुद्धा फोन केला होता. दरवेळी त्याचा फोन येतोच!”

“याशिवाय अमृता खानविलकरचा फोन आला होता. नट्यांमधून मला तेवढा एकच फोन आला. अमृता सिनेमा पाहून फोनवर रडत होती ती आणि तिची आई…याशिवाय माझ्या जवळच्या मित्रमंडळींनी सुद्धा मला फोन केले होते.” असं प्रवीण तरडेंनी सांगितलं. तसेच त्यांना नाना पाटेकरांचा सुद्धा फोन आला होता.

रितेश देशमुख फोनवर काय म्हणाला?

“रितेश सर मला फोनवर म्हणाले, “अभिनंदन प्रवीण…मला खूप बरं वाटतंय कारण, आज एक मराठी सिनेमा दुसऱ्या सिनेमाला टक्कर देत पुढे जातोय. तू माझ्यापुढे जा…दोन आठवड्याने तुझ्यापुढे अजून कोणीतरी जाऊदेत. आपल्या मराठी सिनेमाला भरपूर यश मिळूदेत. ही किती सुंदर भावना आहे. त्यामुळे सिनेमा कोणाचाही असो रितेश देशमुख, प्रवीण तरडे किंवा नागराज मंजुळे उद्देश एकच…आपला मराठी सिनेमा मोठा झाला पाहिजे.”

दरम्यान, ‘देऊळ बंद २’ चित्रपटाच्या क्लायमॅक्सलाच प्रवीण तरडेंनी ‘देऊळ बंद’च्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. यामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांना गश्मीर महाजनी पाहायला मिळेल. याचबरोबर प्रवीण तरडेंनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आता ते ‘मुळशी पॅटर्न २’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होणार असल्याचं सांगितलं आहे.