Pravin Tarde shares anecdote: प्रवीण तरडे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजपर्यंत अनेक चित्रपटांतून विविध धाटणीच्या भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेत. ‘देऊळ बंद’, ‘धर्मवीर’, ‘धर्मवीर २’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘मुळशी पॅटर्न’ अशा विविध चित्रपटांतून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
आता प्रवीण तरडे यांचे एक वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी नुकताच ‘मिर्ची मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक अनोळखी व्यक्ती भेटल्याची आठवण सांगितली. ते म्हणाले की माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील हा किस्सा आहे. एका प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या मोठ्या लेखकांची संपूर्ण माहिती गोळा करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती.
“एक माणूस अचानक…”
“मी मुंबईमध्ये वेगवेगळ्या लेखकांच्या घरी फिरत होतो. रत्नाकर मतकरी, विजय केंकरे, आत्माराम मेंढे अशा अनेक मोठ्या लेखकांकडे गेलो होतो. त्यांच्याकडून मी त्यांची पुस्तके वगैरे घेतली होती. त्यांचे ओरिजनल फोटो, हस्तलिखितं असं खूप महत्त्वाचं साहित्य माझ्याकडे होतं. त्यावेळी मी लोकलने प्रवास करायचो. इतकं साहित्य घेऊन मी लोकलमध्ये चढलो. एक माणूस अचानक माझ्याकडे आला. तो मला म्हणाला की किती पिशव्या आहेत. माझ्याकडे द्या. मी त्यांना का असं विचारलं. त्यावर ते म्हणाले की तुम्ही एवढ्या पिशव्या घेऊन फिरत आहात, तुम्हाला जड होत आहे.”
दोन स्टेशन गेल्यानंतर गर्दी खूप वाढली. तो माणूस गर्दीत माझ्याबरोबर पिशव्या घेऊन बसला होता. खाली उतरल्यानंतर मी त्याला म्हटलं की माझ्याकडे पिशव्या द्या. त्याने नकार दिला, माझ्याबरोबर येतो म्हणाला. माझ्या मनात विचार आला की हा माणूस हे साहित्य घेऊन पळून जाईल. माझ्यापेक्षा भरभर चालत होता. मग अजून संशय वाढला.
“आजही मला त्या माणसाचा चेहरा…”
“त्याने मला विचारलं की कुठे जाणार? मी त्याला म्हणालो की स्टेशनच्या बाहेर गेलो की एशियाडमध्ये बसणार. तो म्हणाला की एशियाड इथून दूर आहे. तिथपर्यंत हे साहित्य घेऊन चालत जाणार. तो मला म्हणाला की आपण रिक्षा करू. त्यानेच रिक्षा बोलावली. मला वाटलं की हा रिक्षावाला याच्या ओळखीचा असेल. उतरताना त्यानेच ते साहित्य उचलण्यासाठी मदत केली. तिकीट काढलं आहे का असे प्रश्न त्याने विचारलं. त्याने मला गाडीत बसवलं. जेव्हा मी बसलो तेव्हा त्याने मला हात केला आणि सरळ निघून गेला. आजही मला त्या माणसाचा चेहरा लक्षात आहे. त्यानंतर मला माझी लाज वाटायला लागली. दरवेळी प्रत्येकावरच संशय कसा घ्यायचा? असा मनात विचार आला”, असे म्हणत प्रवीण तरडे यांनी आठवण सांगितली.
ते पुढे म्हणाले, “मला अशा कोणत्यातरी माणसाला मदत करायची आहे, अशा गर्दीत मदत करायची आहे, जो मला चेहऱ्याने ओळखत नाही”, असे म्हणत प्रवीण तरडे यांनी भावना व्यक्त केल्या.
