Pravin Tarde : प्रविण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या १९ दिवसांत या सिनेमाने ७० कोटींचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे सध्या प्रविण तरडे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. १० ते १३ जून या दरम्यान ते विदर्भ व खान्देशातील चित्रपटगृहांना भेट देणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रविण तरडेंनी मुंबई-पुण्यासह सातारा, कोल्हापुरातील अनेक चित्रपटगृहांमध्ये जाऊन प्रेक्षकांची भेट घेतली. मात्र, ‘देऊळ बंद २’ला सध्या मिळणारा प्रतिसाद पाहता प्रविण तरडेंनी संपूर्ण महाराष्ट्र दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रविण तरडेंनी विदर्श-खान्देश दौऱ्याची सुरुवात नागपूरपासून केली आहे. नागपूरला पोहोचल्यावर सर्वप्रथम त्यांनी गरमागरम तर्री पोह्यांचं आस्वाद घेतला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे असल्याने त्यांना तर्री पोहे खूप आवडतात. तर्री पोहे हा महाराष्ट्रातील नागपूरसह संपूर्ण विदर्भ विभागातील एक अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे.
प्रविण तरडेंनी नागपूरचे तर्री पोहे खाल्ल्यावर एका शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. पहिला घास खाल्ल्यावरच त्यांनी “लाजबाब” असं म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
प्रविण तरडे म्हणतात, “आज मला समजलं…देवेंद्र फडणवीस साहेब नागपूरच्या तर्री पोह्यांचं एवढं कौतुक का करतात…लाजबाब! नागपूरच्या रामजी शामजीचे तर्री पोहे…देवाभाऊ तुम्ही सांगितल्यावर हे पोहे खाल्ले. आता इथून पुढे नागपूरला आल्यावर आधी तर्री पोहे… मग सावजी!”
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ‘देऊळ बंद २’ चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल सुरू आहेत. मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांच्या ‘देऊळ बंद २’मध्ये प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाने १९ दिवसांत ७०.४० कोटींची कमाई केली आहे. खरंतर, या सिनेमाचं बजेट फक्त ८-१० कोटी असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितलं जात आहे. त्यामुळे सध्याचं कलेक्शन पाहता हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आहे. आता ‘देऊळ बंद २’ यशानंतर प्रविण तरडे ‘मुळशी पॅटर्न २’ सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.
