‘देऊळ बंद २’ सिनेमाच्या यशामुळे सध्या महाराष्ट्रातील घराघरांत प्रवीण तरडे व त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांचं कौतुक करण्यात येत आहे. तरडेंनी दिग्दर्शित केलेले आतापर्यंतचे सगळेच सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. त्यांनी रंगभूमीपासून आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली होती. प्रायोगिक नाटकांसाठी काम करत असताना प्रवीण तरडेंची स्नेहल यांच्याशी ओळख झाली. काही दिवसांतच दोघांमध्ये छान मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी २००९ मध्ये लग्नगाठ बांधली.

स्नेहल यांनी मध्यंतरी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळली होती. प्रवीण तरडे यांनी साधारण २००४ मध्ये नोकरी सोडून प्रायोगिक नाटकात काम करण्यास सुरुवात केली. नोकरी सोडून नाटकात काम करायचा निर्णय घेतल्याने त्यांना राहत्या घरातून बाहेर काढण्यात आलं होतं. याचदरम्यान एकांकिका स्पर्धेत काम करताना प्रवीण आणि स्नेहल यांची ओळख झाली. नाटकाच्या प्रयोगासाठी तेव्हा दोघंही बाईकवरुन प्रवास करायचे. हळुहळू दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. प्रवीण तरडेंचं नाटकावरचं प्रेम, त्यांची तळमळ पाहून स्नेहल भारावून गेल्या होत्या. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन प्रवीण तरडे यांनी स्नेहल यांना लग्नाची मागणी घातली. त्यांनी सुद्धा होकार कळवला. मात्र लग्नाचा विषय घरी समजल्यावर दोघांच्या नात्याला विरोध करण्यात आला होता.

प्रायोगिक नाटकांमधून घर चालवण्याइतके पैसे जमत नव्हते. त्यात स्नेहल आणि प्रवीण यांच्या वयात तब्बल १२ वर्षांचं अंतर होतं. घर नाही, पैसे नाही आणि वयातील अंतर पाहून स्नेहल यांच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला.

यानंतर एके दिवशी प्रवीण यांनी स्नेहलला तुझ्या आईला मी मालिकांचं लिखाण करतो असं सांगायला सांगितलं. परंतु, स्नेहल आईशी खोटं कसं बोलणार या विचारात होत्या. अशा परिस्थितीत प्रवीण तरडेंनी मुंबईतील मित्रांना फोन करुन मालिका लेखनाचं काम मिळवलं. ‘अग्निहोत्र’ आणि ‘असंभव’ मालिकेचं कोणतंही क्रेडिट न घेता प्रवीण तरडे यांनी लेखन केलं होतं. या कठीण परिस्थितीवर मात करुन पुढे प्रवीण तरडेंनी मराठी कलाविश्वात मोठं नाव कमावलं.

या संपूर्ण प्रवासात प्रवीण तरडेंना बायकोने मोठी साथ दिली. ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ अशा दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. येत्या डिसेंबर महिन्यात या दोघांच्या सुखी संसाराला १७ वर्षे पूर्ण होणार आहेत.

याशिवाय ‘देऊळ बंद २’ सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता प्रवीण तरडे ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमाचं काम सुरू करणार आहेत.