प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रातून सध्या तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने अवघ्या सात दिवसांत बॉक्स ऑफिसवर २८.२७ कोटींचा गल्ला जमावला आहे. सध्या सर्वत्र ‘देऊळ बंद २’चे शोज हाऊसफुल्ल सुरू आहेत. यामध्ये अभिनेत्री स्नेहल तरडे आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींच्या प्रमुख भूमिका आहेत. आज चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात जे काही यश मिळतंय, ते फक्त स्वामींच्या कृपेने…असं म्हणत स्नेहल तरडेंनी सोशल मीडियावर एक सुंदर अन् भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
स्नेहल तरडेंनी या पोस्टसह ‘देऊळ बंद २’च्या चित्रीकरणादरम्यानचे काही गोड फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रवीण व स्नेहल तरडे यांचं सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळत आहे. या पोस्टला अभिनेत्रीने “तू, मी आणि ‘देऊळ बंद २!” असं कॅप्शन दिलं आहे.
स्नेहल तरडे लिहितात, “आज १ आठवडा झाला चित्रपट प्रदर्शित होऊन… चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद होतो आहे. तू आणि मी… एकाच कलेच्या प्रेमात असणारी दोन माणसं! स्वामींनी आपल्याला एकत्र आणलं. त्यात आपलं एकमेकांवर असलेलं प्रेम आणि आपलं आपल्या कलेवर असलेलं प्रेम, या दोन्ही गोष्टींची गुंफण घालून त्यांना काहीतरी वेगळं साध्य करुन घ्यायचं होतं…. हे मला आता कळतंय. आपलं निमित्त करुन अनेक सामाजिक प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, देवावर वाढत असलेली अश्रद्धा अशा अनेक गोष्टी अधोरेखित करुन त्यावरचे उपाय समाजाला सांगायचे होते स्वामींना….”
“या चित्रपटातून मिळणारा नफा…ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या मुलींच्या थांबलेल्या शिक्षणावर खर्च करायचा हा निर्णयही निर्मात्यांनी स्वामीकृपेने घेतला. स्त्रियांना आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी मदत करायची होती स्वामींना…योग्य वेळ साधून सगळं काही घडवून आणलं त्यांनी! त्यांच्या या एवढ्या मोठ्या कृपेचे आपण पात्र ठरलो आहोत हे आपलं केवढं मोठं भाग्य म्हणायचं!! स्वामी महाराज, तुमची अशीच कृपा जन्मोजन्मी आमच्या भाग्यात येवो, हीच तुमच्या चरणी प्रार्थना! श्री स्वामी समर्थ महाराज की जय!” अशी पोस्ट लिहित स्नेहल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘देऊळ बंद २’ सिनेमात स्नेहल तरडे आणि मोहन जोशींसह अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. प्रसाद ओक, ओम भूतकर, महेश मांजरेकर, रमेश परदेशी, संस्कृती बालगुडे असे बरेच कलाकार यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत.
